पंजाबमधील लष्कराच्या केंद्रापैकी एका ठिकाणी काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने छळाची तक्रार केली असून त्याबाबत लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत.

नैर्ऋत्य कमांडच्या सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी या महिलेने तक्रार केली असून आता त्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशीचे काम प्रगतिपथावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील एका लष्करी केंद्रावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने ही तक्रार केली त्यावर लष्कराने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार चौकशी करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालय व संसदेने लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणांबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही चौकशी केली जाईल. लष्करात काम करताना महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी लष्कर वचनबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करात लैंगिक छळाच्या प्रकारांबाबत अजिबात गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या आरोपांची तातडीने चौकशी केली जात असते व त्यात कुठलेही प्रकरण तर्कसंगत निष्कर्षापर्यंत नेले जात असते.