Army Pilot Proposal Video Nashik: सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात ‘सरप्राईज प्रपोजल’चे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण महाराष्ट्रातील नाशिकमध्ये झालेल्या एका हटके प्रपोजलने सध्या इंटरनेटवर नवा वाद पेटला आहे. कॉम्पॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या पासिंग आउट परेडदरम्यान एका लष्करी पायलट अधिकाऱ्याने आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले असून, काहींनी याला लष्करी शिस्तीचे उल्लंघन म्हटले आहे, तर काहींनी याचे कौतुक केले आहे. आता या संपूर्ण वादात लष्कराचे माजी लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंग धिल्लों यांनी उडी घेतली असून, त्यांनी तरुण कॅप्टनची पाठराखण करत ट्रोलर्सचे कान टोचले आहेत.

लष्कराच्या हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून प्रपोज

नाशिकजवळील लष्कराच्या हवाई प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी पासिंग आउट परेडचा सोहळा पार पडला. हा सोहळा संपल्यानंतर नवनियुक्त पायलट कॅप्टन भरत भारद्वाज यांनी आपल्या प्रेयसीला एक अनपेक्षित सरप्राईज दिले. कॅप्टन भरत आपल्या लष्करी गणवेशात धावपट्टीवर चालत आले. मागे लष्कराचे हेलिकॉप्टर उभे असताना, त्यांनी आपल्या प्रेयसीसमोर गुडघ्यावर बसून अंगठी काढली आणि तिला लग्नासाठी प्रपोज केले. हा रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओने हजारो नेटीझन्सची मने जिंकली, पण सोबतच एका नव्या वादालाही तोंड फुटले…लष्कराच्या शिस्तीत हे बसते का? असा सवाल काही जणांनी उपस्थित केला.

‘देशासाठी प्राण द्यायला सांगता, पण प्रेम व्यक्त करू देत नाही?’ – निवृत्त लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंग धिल्लों

या प्रपोजलवर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, निवृत्त लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लों यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत ट्रोल करणाऱ्यांना ‘नुकताचिन’ (क्षुल्लक टीका) न करण्याचा सल्ला दिला आहे.

“तुम्हाला त्या तरुण अधिकाऱ्याकडून देशासाठी प्राणांचे बलिदान देण्याची अपेक्षा असते, पण त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीबद्दल प्रेम व्यक्त केलेले चालत नाही? आपल्या सैन्यात एक म्हण आहे – ‘यंगस्टर नाही करणार, तर कोण करणार?'” अशा शब्दांत त्यांनी तरुण कॅप्टनचे समर्थन केले. ते पुढे म्हणाले, “जर तुम्हाला त्याच्या व्यावसायिक क्षमतेत किंवा कर्तव्यात कोणतीही चूक आढळली नसेल, तर प्रेमाच्या आणि आपुलकीच्या अशा निखळ भावनेवर क्षुल्लक टीका करणे थांबवा.”

राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आणू नका

काही लोकांनी सुरक्षेचे कारण पुढे करत यावर आक्षेप घेतला होता. त्याला उत्तर देताना धिल्लन म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी ‘नो युवर आर्मी’ (आपले सैन्य जाणून घ्या) या प्रदर्शनांचे आयोजन केले जाते, जिथे लष्करी शस्त्रे आणि हेलिकॉप्टर्स प्रदर्शित केली जातात. तिथे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या अभिमानाने फोटो काढतात. त्यामुळे या प्रकरणात विनाकारण राष्ट्रीय सुरक्षेचा कोन शोधू नका आणि तरुण सैनिकाला अभिमानाने देशाची सेवा करू द्या.

लष्कराकडून स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्यता…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील या चर्चेनंतर लष्कराने या घटनेची दखल घेतली आहे. हा प्रकार लष्कराच्या अंतर्गत शिस्तीच्या नियमांमध्ये बसत नसल्याने, संबंधित अधिकाऱ्याकडून यावर स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे कॅप्टन भारद्वाज यांच्यावर कोणतीही मोठी किंवा कठोर कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणावर नेटीझन्समध्येही दोन तट पाहायला मिळत आहेत. एका युझरने लिहिले, “एका सुंदर आणि भावनिक क्षणामुळे कॅप्टनची देशाप्रती असलेली निष्ठा, शिस्त आणि सेवेवर शंका घेतली जाऊ शकत नाही. या जोडप्याला भविष्यासाठी शुभेच्छा.” तर दुसऱ्या एका युझरने शिस्तीचा मुद्दा मांडत म्हटले, “आमचा प्रश्न त्यांच्या देशप्रेमावर किंवा क्षमतेवर नाही, तर लष्कराच्या सर्वोच्च शिस्तीचा आणि सुरक्षेचा आहे. जर अशा गोष्टी सर्रास होऊ लागल्या, तर भविष्यात लष्कराच्या गोपनीयतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.”