लष्कराच्या शाळेतील हत्याकांड

सर्वोच्च न्यायालयाकडून इम्रान यांची झाडाझडती

पाकिस्तानात २०१४ मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

 दीडशे लोकांचा बळी घेणाऱ्या हत्याकांडातील गुन्हेगारांशी तुम्ही वाटाघाटी का करीत आहात, असा  सवाल न्यायालयाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिनाभराची मुदत सरकारला दिली होती व त्या काळात तेहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात १४७ बळी गेल्याची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते.

मृतांमध्ये त्या वेळी १३२ मुलांचा समावेश होता. सरन्यायाधीश गुलझार अहमद, न्या.काझी महंमद अमीन  अहमद व न्या. ऐझाजउल अहसान यांनी खान यांना सुनावणीसाठी पाचारण केले होते. न्यायालयाने त्यांना अशी विचारणा केली,की आम्ही तुम्हाला या हत्याकांडातील सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले होते. या प्रकरणातील चौकशी व तपासात मुलांच्या पालकांचे समाधान झाले पाहिजे असे  न्या. अहसान यांनी सांगितले.

न्यायालयाने म्हटले आहे,की सुरक्षेतील उणिवांबाबत चौकशी करून संबंधितांना जबाबदार ठरवण्याऐवजी पाकिस्तान सरकार तेहरीक ए तालिबान पाकिस्तानशी वाटाघाटी करीत आहे, शाळकरी मुलांच्या हत्याकांडात बळी पडलेल्यांचे सरकारला गांभीर्य नाही हेच यातून दिसून येत आहे. तुम्ही सत्तेत आहात. सरकार तुमचे आहे. मग तुम्ही करता काय. जे दोषी आहेत त्यांच्याशीच तुम्ही वाटाघाटी करीत आहात, असे सरन्यायाधीश अहमद यांनी इम्रान खान यांना सुनावले.

इम्रान खान यांनी यावर प्रतिसाद देताना सांगितले,की पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्ष खैबर पख्तुनवात सत्ताधारी आहे. आम्ही  फक्त आर्थिक मदत देऊ शकतो. त्यावर सरन्यायाधीश संतप्त झाले. त्यांनी सांगितले की, तुम्ही पीडितांच्या जखमेवर मीठ चोळत आहात. पालक सुरक्षा व्यवस्था कुठे आहे अशी विचारणा करीत असताना आमच्या आदेशानंतरही सरकारने काही कारवाई केली नाही. त्यावर खान यांनी सांगितले,की न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कुणावरही कारवाई करायला तयार आहोत.