पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये दाखल झालेत. सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सुमारे २२ जणांची धरपकड केलीये. मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अडथळे आणले जाऊ नयेत, त्यांना काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत किंवा त्यांच्या विरोधात घोषणाबाजी होऊ नये म्हणून पोलिसांनी या २२ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी होणाऱ्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या २२ कार्यकर्त्यांमध्ये समाजवादी पक्षाचेही काही कार्यकर्ते आहेत. ७ जून रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे लखनौ दौऱ्यावर होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले, तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या योग दिनाच्या कार्यक्रमात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस अधीक्षक दीपक कुमार यांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आले होते. त्यावेळी अनेक आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेराव घालून घोषणाबाजी केली होती. या सगळ्या आंदोलकांना आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. आता मंगळवारी जो योग दिन साजरा होतो आहे, तो शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून २२ जणांची धरपकड केली आहे.