दुबई / नवी दिल्ली : कुवेतमध्ये बांधकाम मजूर राहात असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीत किमान ४९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ४२ भारतीय नागरिक असल्याची माहिती आहे. दुर्घटनेत किमान ५० जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या निर्देशांनुसार परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेतला रवाना झाले आहेत. पंतप्रधानांनी मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली.

दक्षिण कुवेतमधील अल-अहमदी येथील अल मनगाफ  इमारतीला स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे ४.३०च्या सुमारास आग लागली. बांधकाम कंपनी एबीटीसी समूहाने ही इमारत आपल्या मजुरांच्या निवाऱ्यासाठी भाडय़ाने घेतली असून, त्यात १९५ मजूर राहात असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून बळी व जखमींचा नेमका आकडा कालांतराने समजू शकेल, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आगीत सापडलेल्यांपैकी बहुतांश मजूर हे केरळमधील तर अन्य तमिळनाडू व उत्तरेकडील राज्यांतील असल्याची माहिती आहे.

हेही वाचा >>> कथुआतील हल्ल्यात जवान शहीद; कारवाईत दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान

घटनेची माहिती मिळताच परराष्ट्रमंत्री सिंह हे कुवेतला रवाना झाले असून ते जखमींना चांगले उपचार मिळवून देण्यासाठी तसेच बळी पडलेल्यांचे मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणता यावेत, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधतील. कुवेतमधील भारतीय राजदूत आदर्श स्वाइका हेदेखील स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असून त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली असून घटनास्थळाला भेट देऊन बचावकार्याची पाहणी केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. भारतीय दूतावासाने पीडितांच्या नातलगांसाठी ९६५-६५५०५२४६ या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली आहे. कुवेतचे गृहमंत्री शेख फहाद अल युसूफ अल सबा यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून इमारतीच्या मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही दुर्घटना इमारतीचे मालक आणि कंपनीच्या दुर्लक्षामुळे घडल्याचे त्यांनी ‘कुवेत टाइम्स’ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. कुवेतचे आमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनीही या घटनेची दखल घेतली असून अग्निकांडाला दोषी असलेल्यांना माफ केले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

कुवेतमधील आगीची घटना अत्यंत दु:खद आहे. मृतांच्या नातलगांप्रति सहवेदना आणि जखमींना लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थना करतो. कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि पीडितांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान