पश्चिम बंगाल पोलिसांच्या एसटीएफ (विशेष कृती दल) पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या संशयित हमिम मंडल या तरुणाला पोलिसांनी एका निवासी संकुलातून शुक्रवारी अटक केली. हा संशयित तरुण पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या कारवाईनंतर एसटीएफने आणखी एक मोठा कट उधळून लावला आहे.

झारखंडच्या साहिबगंजमधून या हमिम मंडलची कथित मैत्रीण अर्पिता सरकार (वय २२) हिला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर एसटीएफच्या पथकाने तिला पश्चिम बंगालला नेलं आहे. अर्पिता ही ‘हनी-ट्रॅप’च्या नेटवर्कचा मुख्य भाग होती असा संशय पोलिसांना आहे. या माध्यमातून ती पश्चिम बंगालमधील मोठ्या राजकीय नेत्यांना जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांची संवेदनशील वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी हालचाली करत होती, असा संशय एसटीएफला आहे.

मोठ्या राजकीय नेत्यांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘हनी-ट्रॅप’मध्ये अर्पिता ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला आहे. या तरुणीची ओळख अर्पिता सरकार अशी पटली असून ती हमिम मंडलच्या नियमित संपर्कात होती अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. तसेच या दोघांमधील चॅट्स देखील हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एसटीएफ अधिकाऱ्यांकडून आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

हनी-ट्रॅपच्या नेटवर्कचा भाग म्हणून काही व्हिआयपी व्यक्तींना जाळ्यात ओढण्यासाठी ही तरुणी मुख्य भूमिका बजावत होती. काही राजकीय व्यक्तींची संवेदनशील आणि वैयक्तिक व गुप्त माहिती मिळवण्यासाठी आरोपीने एक नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न केला होता, असं तपासादरम्यान आढळून आल्याची माहिती एसटीएफच्या एका अधिकाऱ्यानी दिली.

दरम्यान, हमिम मंडल या तरुणाने काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याच्या अनुषंगाने या तरुणीचा वापर केला होता असा आरोप आहे. दरम्यान, ही माहिती भविष्यात दहशतवादी हल्ले किंवा इतर देशविरोधी कारवायांना मदत करण्यासाठी वापरली जाणार होती का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.