दिल्लीतल्या जंतर-मंतरवर जे विद्यार्थी आंदोलन झालं त्यामागे CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टी होती. कॉक्रोच जनता पार्टी हे सुरुवातीला एक ट्वीटर पेज होतं. या पेजला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यानंतर CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी विद्यार्थी आंदोलनाचा पर्याय निवडला. या आंदोलनाला ३७ दिवसांनी यशही मिळालं कारण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनामुळे अभिजीत दिपके हे चांगलेच चर्चेत आले आहेत. याच अभिजीत दिपकेंना अटक करा अशी मागणी प्रसिद्ध युट्यूबरने केली आहे. काय आहे प्रकरण आपण जाणून घेणार आहोत.

अभिजीत दिपकेंच्या अटकेची मागणी कुणी केली आहे?

प्रसिद्ध युट्यूबर फैजान अन्सारीने अभिजीत दिपकेंच्या विरोधात दिल्लीत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्याने माध्यमांना याबाबतची माहिती दिली. “मी आज CJP पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याविरोधात दिल्लीच्या डीसीपींकडे तक्रार दाखल केली आहे. माझ्यावर दिपके यांच्या माणसांनी हल्ला केला होता आणि याचे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत. यापूर्वी माझ्यावर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे हल्ले झाले असून, त्याप्रकरणी आधीच २ गुन्हे दाखल झालेले आहेत.”

अभिजीत दिपकेंच्या अटकेची मागणी केली आहे-फैजान अन्सारी

अभिजित दिपके हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी हे सर्व करत असल्याचा घणाघाती आरोपही अन्सारीने केला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्याने केली आहे. या तक्रारीमुळे अभिजीत दिपकेंच्या अडचणींत वाढ झाली आहे अशी चर्चा रंगली आहे.

Social media influencer Faizan Ansari displays the written complaint in which he has sought police action against CJP founder Abhijeet Dipke over alleged assaults
युट्यूबरने केली अभिजीत दिपकेंना अटक करण्याची मागणी (फोटो-ANI)

फैजान अन्सारीकडून दिल्ली पोलिसांचं कौतुक

फैजान अन्सारीने दिल्लीचे मुख्यमंत्र्यांचं आणि दिल्ली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केलं. जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान सोनम वांगचूक यांना वेळेत ताब्यात घेतल्याबद्दल त्याने प्रशासनाचे आभार मानले. “दिल्ली पोलिसांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सोनम वांगचुक यांना योग्य वेळी ताब्यात घेतले, ज्यामुळे दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण बिघडण्यापासून वाचले,” असं अन्सारीने म्हटलं आहे. तसंच आपण केलेली लेखी तक्रारही त्याने माध्यमांना दाखवली आणि आपण अभिजीत दिपकेंच्या अटकेची मागणी केली आहे असं फैजानने माध्यमांना सांगितलं. दिल्ली पोलिसांनी २० जुलैला विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज केला होता. ज्यानंतर संपूर्ण देशातून या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढला होता. २५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यानंतर या विद्यार्थ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं.