नवी दिल्ली : भाजपने दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारविरोधात आणखी एका ‘स्टिंग ऑपरेशन’ची चित्रफीत जारी केली. त्यानंतर ‘हे खरे असेल तर आपल्याला सीबीआयने चार दिवसांत अटक करावी,’ असे आव्हान दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिले.

या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये ‘निवडक लोकांना फायदा मिळावा म्हणून राज्याचे उत्पादन शुल्क धोरण ठरवण्यात आले होते,’ असे मद्य घोटाळय़ातील एक आरोपी कथितरित्या म्हणत आहे. मात्र ही नकली चित्रफीत भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या कार्यालयांमध्ये तयार केल्याचा आरोप सिसोदियांनी केला. सोमवापर्यंत सीबीआयने आपल्याला अटक केली नाही, तर पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी सिसोदियांचे कौतुक केले. ‘सत्य आणि धाडसी व्यक्तीच असे आव्हान देऊ शकतो,’ असे ते म्हणाले.