झुबेर, सेटलवाड यांच्यावरील कारवाईबद्दल भाजपवर टीकास्त्र

आसनसोल, पीटीआय : ‘अल्ट न्यूज’ वृत्तसंस्थेचे संस्थापक मोहम्मद झुबेर व सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांना अटक केल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केंद्रातील भाजपप्रणीत सरकारवर टीकास्त्र सोडले. संरक्षण दलातील अग्निपथ भरती योजनेवरही त्यांनी टीका केली. झुबेर आणि सेटलवाड यांनी कोणते चुकीचे कृत्य केले म्हणून त्यांना अटक करण्यात आली? असा सवाल  विचारून, त्यांनी सत्य बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते व नूपुर शर्मासारख्या प्रवक्त्यांच्या द्वेषमूलक विखारी वक्तव्यानंतरही त्यांना अटक केली जात नसल्याची टीका केली.

पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील आसनसोल येथे तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत त्या बोलत होत्या. २०२४ च्या निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून अग्निपथ योजना आणल्याची टीका करून, ममता म्हणाल्या, की विद्यमान केंद्र सरकारचे भ्रष्ट आचरण आणि खोटय़ा आश्वासनांच्या राजकारणाचे हे आणखी एक उदाहरण आहे. सत्य बोलणे किंवा सत्य उघड करणे गुन्हा असतो का? केंद्रातील भाजप सरकारच्या विरुद्ध बोलणाऱ्यांच्या मागे सरकारी तपाससंस्थाचा ससेमिरा लावला जात आहे. त्यांना अटक केली जात आहे. प्रेषितांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचा उल्लेख करून, ममता म्हणाल्या, की द्वेषमूलक वक्तव्य करून देशभर हिंसाचार भडकवणाऱ्यांना अटक केली जात नाही. दोन समाजांत शत्रुत्व निर्माण करणाऱ्यांना भाजपने अद्याप हातही लावलेला नाही.

पाहा व्हिडीओ –

अग्निपथ योजनेंतर्गत भरती केलेल्या सैनिकांच्या निवृत्तीचे वय ६० वर्षांपर्यंत वाढवले पाहिजे. चार वर्षांची मुदत संपल्यानंतर या युवकांसमोरचे भविष्य अनिश्चित असेल. मला नुकतेच केंद्राकडून पत्र मिळाले. त्यात अग्निवीरांना चार वर्षांनंतर राज्य सरकारच्या सेवांमध्ये संधी देण्याबाबत सांगितले होते. परंतु ही केंद्र सरकारने निर्माण केलेली समस्या आहे. त्यामुळे ही जबाबदारी केंद्राचीच आहे. राज्य सरकार याची जबाबदारी घेणार नाही.

झुबेर यांच्या सुटकेची ‘एडिटर्स गिल्ड’ची मागणी

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावणे व द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली बातम्यांतील तथ्य तपासणारे संकेतस्थळ (फॅक्ट चेक वेबसाईट)  ‘अल्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना केलेली अटक खूपच चिंताजनक असल्याचे  ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने म्हटले असून, त्यांची त्वरित मुक्तता करण्याची मागणीही केली. गिल्डने निवेदनात नमूद केले आहे,  समाजाचे ध्रुवीकरण व अपप्रचाराचा हत्यारासारखा वापर करून भावना भडकावणाऱ्या व्यक्ती  ‘अल्ट न्यूज’च्या सतर्क व नि:पक्षपाती दृष्टिकोनास विरोध करत आहेत. झुबेर यांच्यावर कलम १५३ व २९५ अंतर्गत केलेली कारवाई चिंताजनक आहे. झुबेर आणि त्यांच्या संकेतस्थळाने काही वर्षांपासून खोटय़ा बातम्यांना उघड केले आहे. ध्येयवादी व सत्याचा मार्ग अनुसरत अपप्रचारांमागील तथ्य समोर आणण्याचे अनुकरणीय कार्य केले आहे.