दोन आठवड्यांपूर्वी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवद्याचा शनिवारी मृत्यू झाला. जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील लष्कर रुग्णालयात दहशतवाद्यावर उपचार सुरु होते. यावेळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. भारतावर हल्ला करण्याच्या हेतूने या दहशतवाद्याला पाकिस्तानने पाठवलं होतं. विशेष म्हणजे, त्याच्यावर उपचारादरम्यान भारतीय जवानांनी रक्तदान केलं होतं.

तबारक हुसैन अशी या दहशतवाद्याची ओळख पटली होती. पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा तो निवासी होता. गेल्या महिन्यात राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर येथे त्याने नियंत्रण रेषा ओलांडत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता.

काश्मीरमध्ये मोठी कारवाई! दहशतवाद्याला जिवंत पकडलं, पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने ३० हजार रुपये दिल्याचा खुलासा

इंडिया टुडेसोबत उपचारादरम्यान साधलेल्या संवादादरम्यान, दहशदतवाद्याने आपल्या पाकिस्तानी लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवलं असल्याची कबुली दिली होती.

दहशतवाद्याने काय माहिती दिली होती?

तबारक हुसैनने दिलेल्या माहिनीनुसार, पाकिस्तान गुप्तचर विभागातील कर्नल युनूस चौधरी याने आपल्याला भारतात दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं. त्याने आपल्याला ३० हजार रुपये (पाकिस्तानी चलन) दिले होते. हल्ला करण्यासाठी आपण दोन ते तीन भारतीय चौक्यांची टेहाळणीही केली असल्याचा खुलासा त्याने केला होता.