पीटीआय, श्रीनगर : फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला न्यायालयाने शिक्षा सुनावण्यापूर्वी श्रीनगरमधील मैसुमा भागात दगडफेक करणाऱ्या व देशविरोधी घोषणा देणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवादाला निधीपुरवठा केल्याच्या एका प्रकरणात दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने गुरुवारी आघाडीचा फुटीरवादी नेता मलिक याला बुधवारी जन्मठेप सुनावली होती.

‘शिक्षा जाहीर होण्यापूर्वी बुधवारी मैसुमा येथे यासिन मलिकच्या घराबाहेर देशविरोधी घोषणा देणाऱ्या व दगडफेक करणाऱ्या १० आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. इतर सर्व भाग शांत होते. ज्यामुळे युवकांचे भवितव्य धोक्यात येईल आणि कुटुंबापुढे अडथळे निर्माण होतील अशा कारवायांमध्ये सहभागी होऊ नये, अशी त्यांना पुन्हा विनंती करण्यात येत आहे,’ असे श्रीनगर पोलिसांनी ट्विटरवर लिहिले.

‘या घटनांमध्ये सामील असलेल्या इतरांची ओळख पटवण्यात येत असून त्यांना लवकरच अटक केली जाईल. या गुंडगिरीच्या मुख्य सूत्रधारांवर सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली गुन्हे दाखल केले जातील. अशा प्रकारच्या देशविरोधी कारवायांचा कठोरपणे मुकाबला केला जाईल,’ असेही पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी श्रीनगरच्या काही भागांमधील दुकाने बंद होती, मात्र वाहतूक सामान्य होती. शाळा सुरळीतपणे सुरू होत्या, तर शासकीय व खासगी कार्यालयांतील उपस्थिती सामान्य होती. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सामान्यपणे शांत असल्यामुळे गुरुवारी सकाळी मोबाइल इंटरनेट सेवाही पुन्हा सुरू करण्यात आल्या, असे अधिकारी म्हणाले.