फरीदाबाद या ठिकाणी जैश ए मोहम्मद विंगची हेड डॉ. शाहीनाचा पहिला फोटो समोर आला आहे. डॉ. शाहीना ही जैश ए मोहम्मद च्या महिला विंगची म्हणजेच जमात-उल-मोमिनातची प्रमुख होती. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार शाहीनाला भारतात महिलांना कट्टरपंथी विचारधारांशी जोडण्याची जबाबदारी तिला देण्यात आली होती. फंडिंग, मानसिक स्तरावरचं द्वंद्व, प्रचार या सगळ्या गोष्टींची तिला जबाबदारी देण्यात आली होती.

सादिया जे पाकिस्तानात करत होती तीच जबाबदारी शाहीनावर

पाकिस्तानात मसूद अजहरची बहीण सादिया अजहर या सगळ्या गोष्टी बघत होती. सादियाचा पती युसूफ अजहर हा कंदहार हायजॅक प्रकरणाचा मास्टरमाईंड होता. जैश ए मोहम्मद या संघटनेने महिलांच्या धार्मिक जबाबदाऱ्या, जिहादच्या नावे जोडण्याची योजना तयार केली आहे. भारतात डॉक्टर शाहीनासारख्या लोकांवर ही जबाबदारी देण्यात आली होती.

कोण आहे डॉ. शाहीना?

डॉ. शाहीनाला दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे.

जैश ए मोहम्मदची महिला विंग उभारण्याची जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली होती.

डॉ. शाहीना लखनऊ येथील लाल बाग परिसरात वास्तव्य करत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

फरिदाबाद येथील दहशतवादाचं मोड्युल पोलिसांनी उधळून लावलं. त्यात ज्यांना अटक करण्यात आली त्यापैकी एक डॉ. शाहीनाही आहे.

टेलिग्राम ग्रुपवर एकत्र होते डॉक्टर

अल फला विद्यापीठात डॉ. शाहीना शिकवत होती. शाहीना ज्या ठिकाणी शिकवत होती त्या विद्यापीठात अनेक विद्यार्थी शिकत आहेत. जिहादसाठी किती विद्यार्थ्यांना तिने तयार केलं होतं का याची माहिती आता घेतली जाते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेलिग्रामचा ग्रुप तयार करम्यात आला होता. त्यामध्ये काही डॉक्टरांचा सहभाग होता. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

दिल्ली कार स्फोट प्रकरणात तिघे ताब्यात

दिल्ली कार स्फोट प्रकरणात तारिक अहमद मलिक, आमिर रशिद, उमर राशिद या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आमिर आणि उमर हे दोघं भाऊ आहेत. दिल्लीत झालेल्या स्फोटात आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला. २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

दिल्ली स्फोटावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान मोदींनी भूतानमध्ये केलेल्या भाषणात दिल्ली स्फोटावर शोक व्यक्त केला. तसेच, या कट-कारस्थानामागील व्यक्तींना भारत सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असं ते म्हणाले. “भूतानमध्ये आज या प्रसंगी सहभागी होणं भारत व माझी बांधिलकी होती. पण आज मी इथे खूप भावनिक होऊन आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयावह घटनेनं सगळ्यांना दु:खी केलं आहे. मी पीडित कुटुंबीयांचं दु:ख समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.