Why are companies laying off employees: गेल्या काही दिवसांपासून आयटी कंपन्यांमध्ये नोकरकपातीचे संकट आले आहे, असे काहीसे वातावरण समाज माध्यमांवर आहे. अनेक कर्मचारी त्यांना कंपनीतून अचानक कामावरून कशा पद्धतीने काढले, याची माहिती समाज माध्यमांवर देत आहे. तसेच काही मोठ्या टेक कंपन्यांमध्येही नोकरकपात होत आहे. त्यामुळे जगभरातील अशा कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची भीती कायम सतावत आहे. कंपन्यांनी अचानक केलेल्या नोकरकपातीमुळे काही कामगारांनी सरकारकडे दादही मागितली होती. या कंपन्यांमध्ये ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’चा (AI) वाढता वापर हे नोकरकपातीचे एक प्रमुख कारण सांगितले जात आहे. पण यात खरंच कितपत तथ्य आहे?

‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’च्या अहवालातून एक नवीन माहिती समोर आली आहे. सध्या होत असलेल्या नोकरकपातीमागे फक्त AI नसून त्यात पारंपरिक आर्थिक शक्तीचाही (Traditional Economic Forces) वाटा असल्याचे समोर आले. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालात, या संस्थेला असे आढळून आले की, कंपन्या नोकरकपातीची घोषणा करताना वाढत्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख करत आहेत. पण खरं कारण हे नाही. बहुतेक नोकरकपातीची मुळे ही बाजारातील मंदावलेली वाढ, कमकुवत मागणी, खर्चाचा दबाव आणि कॉर्पोरेट पुनर्रचना यांसारख्या परिचित आव्हानांमध्येच आहेत, असे दिसून आले आहे.

अर्थिक दबाव ठरतोय कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक

प्रसिद्ध अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यात अनेक महत्त्वाची तथ्ये आहेत. बाजारातील नोकरकपात नेमक्या कोणत्या कारणांमुळे होत आहे? तसेच त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितपत वाटा आहे? हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. या अहवालानुसार, जरी कर्मचारी कपातीच्या घोषणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वारंवार उल्लेख केला जात असला तरी, ते यामागील प्राथमिक कारण क्वचितच असते. त्याऐवजी, अहवालात असे आढळून आले आहे की, बहुतेक कर्मचारी कपात ही आर्थिक वाढीची संथ गती, कंपन्यांची आक्रमक खर्च कपात, सततची बाजारातील अनिश्चितता आणि कोरोना महामारीनंतरच्या तेजीच्या काळात झालेल्या अतिरिक्त भरती यांसारख्या कारणांमुळेच होत आहे.

कंपन्यांनी नोकरकपातीमागे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख केल्याने कर्मचारी कपातीला आर्थिक तणावावरील (Economic Pressures) प्रतिक्रिया म्हणून नव्हे, तर भविष्याचा वेध घेणाऱ्या नवीन धोरणाचा भाग म्हणून सादर करण्यास मदत होते. संशोधकांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे झालेल्या नोकरकपातीचे प्रमाण कमी दाखवण्यापेक्षा जास्त दाखवले जाण्याची शक्यता अधिक आहे, कारण खोलवरच्या आर्थिक समस्यांभोवतीची परिस्थिती सौम्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

आकडे काय सांगतात?

दुसरीकडे आकडे वेगळी माहिती सांगत आहेत. ‘चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस’च्या आकडेवारीनुसार, जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेशी (AI) संबंधित नोकरकपात वाढत आहेत. २०२५ च्या पहिल्या ११ महिन्यांत अमेरिकेत जवळपास ५५,००० नोकऱ्या AI मुळे गेल्या, जी २०२३ पासून नोंदवलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित एकूण नोकरकपातीपैकी सर्वाधिक आहे. परंतु, व्यापक संदर्भात पाहिल्यास, हा आकडा माफकच आहे. ही नोकरकपात एकूण नोंदवलेल्या नोकरकपातीच्या केवळ ४.५ टक्के आहे. त्या तुलनेत, याच काळात व्यापक आर्थिक आणि बाजाराच्या परिस्थितीमुळे २,४५,००० पेक्षा जास्त नोकरकपात झाली. सर्व कारणांमुळे दरमहा अंदाजे १.५ ते १.८ दशलक्ष अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या जात असताना, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणारी नोकरकपात हा एकूण बेरोजगारीच्या तुलनेत एक छोटासाच भाग आहे.

ज्या विभागामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक वापर केला जातो त्यामध्ये पुढील क्षेत्रांचा समावेश होतो-

१. संशोधन आणि डेटा विश्लेषण

२. कंटेंट क्रिएशन

. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

४. प्रशासकीय कामे

यामुळे या क्षेत्रात नव्याने नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.