US-Israel-Iran War Updates: सध्या सुरू असलेले अमेरिका आणि इस्त्रायलचे इराणविरुद्धचे युद्ध अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या संघर्षात अमेरिकन सैन्याने इराणवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले असून, या हल्ल्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. हल्ल्यांची अचूकता वाढवण्यासाठी अमेरिकेने एआय प्रणालींचा वापर केल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने ‘अँथ्रोपिक’ या तंत्रज्ञान कंपनीचे एआय मॉडेल ‘क्लॉड’ वापरले. या तंत्रज्ञानामुळे लक्ष्य ओळखण्यापासून ते हल्ल्याला मंजुरी मिळेपर्यंतची प्रक्रिया म्हणजेच ‘किल चेन’ लक्षणीयरीत्या कमी होते. त्यामुळे कमी वेळेत अचूक लक्ष्यांवर हल्ले करणे शक्य झाले.
मादुरो यांना पकडण्यासाठी क्लॉडचा वापर
जानेवारी महिन्यात व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी अमेरिकन सैन्याने या क्लॉड प्रणालीचा वापर केला होता. मात्र, अँथ्रोपिक कंपनीने आपल्या वापराच्या अटींचा दाखला देत या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. कंपनीच्या नियमांनुसार क्लॉडचा वापर हिंसक कारवाया, शस्त्रविकास किंवा पाळत ठेवण्यासाठी करण्यास मनाई आहे.
एआय कंपनीवर टीका
हा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मान्य नव्हता. त्यांनी अँथ्रोपिकसोबतचे सर्व संबंध तोडण्याचे आदेश दिले आणि त्या कंपनीला “कट्टरपंथी डावी एआय कंपनी” असे संबोधले. पेंटागॉनचे प्रमुख आणि अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हेग्सेथ यांनीही ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. मात्र, लगेचच दुसऱ्या एआय प्रणालीकडे वळणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याचे त्यांनी मान्य केले.
१२ तासांत ९०० क्षेपणास्त्रे डागली
दरम्यान, एआयच्या मदतीने अमेरिकेने युद्धाच्या पहिल्या १२ तासांतच इराणमधील विविध लक्ष्यांवर सुमारे ९०० क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यांदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयोतुल्लाह अली खामेनी यांच्या परिसरावरही हल्ला झाला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, युद्ध सुरू होण्यापूर्वीच या एआय प्रणालीने अमेरिकन सैन्याला शेकडो संभाव्य लक्ष्यांची यादी सुचवली होती. या लक्ष्यांना प्राधान्यक्रम देऊन त्यांच्या अचूक स्थान निर्देशांकांसह माहिती देण्यात आली होती. तसेच प्रत्येक लक्ष्यावर कोणते शस्त्र वापरावे, याचीही शिफारस प्रणालीकडून करण्यात येत होती.
इराणचा डेटा सेंटरवर हल्ला
दरम्यान, या युद्धात इराणने एआयचा वापर केला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. मात्र, अलीकडेच आखाती देशांतील अमेरिकन डेटा सेंटरवर इराणी ड्रोन हल्ले झाल्याचे वृत्त आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने युद्धात एआयचा वापर केल्याच्या पार्श्वभूमीवर तेहरानने या केंद्रांवर हल्ला करून अमेरिकेच्या माहिती संकलन क्षमतेला धक्का देण्याचा प्रयत्न केला असावा.
