प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचे गुरूग्राम, हरियाणातील शो रद्द करण्यात आले आहेत. १७ आणि १८ सप्टेंबरला कुणाल कामराचे हे शो होणार होते. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या धमकीनंतर हे शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर आता कुणाल कामराने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कुणाल कामरा म्हणाला की, “कलाकार सध्या दहशतीखाली काम करत आहे. जे कोणत्याही कलेसाठी चांगलं नाही आहे. बॉलिवूडपासून कॉमेडियनपर्यंत सर्वजण कोणत्या ना कोणत्या भितीच्या दबावाखाली काम करत आहेत. आपल्या संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत लिहण्यात आलं आहे. मग, एखाद्या हिंसाचाराला भडकवण्यासाठी कोण कारणीभूत आहे, हे ठरण्यासाठी न्यायालय दिलं आहे. तर, न्यायालयाला ठरवू द्या कोण, हिंदू आहे, कोण हिंदू विरोधी आहे.”

पुढे त्याने म्हटलं की, “दु:ख या गोष्टीचं आहे की, पोलीस अधिकारी, पोलीस आयुक्तसुद्धा जे नथुराम गोडसेचे समर्थक आहेत, त्यांच्या निर्देशांचं पालन करतात.” तो एनडीटीव्हीशी बोलत होता.

हेही वाचा – बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेची धमकी; कुणाल कामराचे ‘या’ राज्यातील शो रद्द

“त्या बिचाऱ्याचा काय संबंध”

शो रद्द झाल्यावर कुणाल कामराने विश्व हिंदू परिषदेला पत्र लिहलं आहे. “मी तुमच्या नावामध्ये विश्व लिहलं नाही, कारण तुम्ही विश्वातील हिंदूंचा मक्ता घेतलेला नाही. हे तुम्ही स्वतःच समजत आहात. गुरूग्राममध्ये होणाऱ्या माझ्या शोला तुम्ही विरोध केला. तसेच, ज्या क्लबमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या मालकाला देखील तुम्ही धमकावले आहे. त्या बिचाऱ्याचा काय संबंध? तो पैसे कमावत आहे. तो पोलिसांकडे गेला तर पोलीस तुमच्याकडे विनंती करण्यासाठी येईल. सगळी यंत्रणा तुमच्या हातात आहे,” असं कामराने आपल्या पत्रात म्हटलं आहे.