भारतरत्न पुरस्कारानंतर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराची प्रजासत्ताक दिनाच्या काही तास आधी घोषणा करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खासदार मेरी कोम, छन्नुलाल मिश्रा, अनेरूद जुगुनाथ जीसीएसके, विश्वेतीर्थ स्वामीजी पेजवरा अधोखाजा मठ उडुपी यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावाची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली. यात राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य आदी क्षेत्रात काम करणाऱ्या देशविदेशातील १४१ मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्म भूषण –

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी मुमताज अली, सय्यद मुझीम अली (मरणोत्तर), मुझफ्फर हुसेन बेग, कला क्षेत्रातील कार्यासाठी अजोय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोशी, क्रिष्णम्मल जगन्नाथन, एस. सी. जमीर, अनिल प्रकाश जोशी, डॉ. त्सेरिंग लंडोल, आनंद महिंद्रा, निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर), जगदीश शेठ, बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधू, वेणू श्रीनिवासन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म पुरस्कार : संपूर्ण यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील या मान्यवरांचा गौरव –

पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचाही गौरव करण्यात येणार आहे. यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय संघातील माजी गोलंदाज झहीर खान, डॉ. रमण गंगाखेडकर, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, ज्येष्ठ अभिनेत्री सरिता जोशी, आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार, दिग्दर्शक एकता कपूर, बीजमाता राहीबाई पोपेरे, अभिनेत्री कंगना राणौत, गायक अदनान सामी, सामाजिक कार्यकर्ते सय्यद मेहमूद शाह कादरी उर्फ सय्यदभाई, साँड्रा डिसूझा, गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.