करोनाविरुद्धच्या लढाईत आता देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी देशाने करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला. ज्या व्यक्तीने १०० कोटीवी लस घेतली ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीची रहिवासी आहे. जाणून घ्या त्या व्यक्तीविषयी…

दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात करोना प्रतिबंधक लसीचा १०० कोटीवा डोस देण्यात आला. हा डोस अरुण रॉय यांना देण्यात आला. अरुण रॉय वाराणसीचे रहिवासी असून ते दिव्यांग आहेत. मात्र त्यांची नाराजी अशी की त्यांना पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली नाही.

अरुण रॉय यांनी सांगितलं की, जेव्हा ते दिल्लीला आले होते, तेव्हा देशात ७० कोटी लसमात्रा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ठरवलं की आपण १०० कोटीवी लसमात्रा घ्यायची. रॉय दिल्लीमध्ये आपल्या एका मित्राकडे आले होते. त्या मित्राला त्यांनी लसीसाठी नोंदणी करायला सांगितलं.

त्यानंतर दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांची नोंदणी झाली. जेव्हा त्यांनी लसीचा १०० कोटीवा डोस घेतला तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतली. जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना विचारलं की आत्तापर्यंत तुम्ही लस का घेतली नव्हती? तेव्हा रॉय यांनी सांगितलं की, लसीबद्दल त्यांच्या मनात गैरसमज होता. मात्र जेव्हा त्यांना कळलं की ७० कोटी लोकांनी लस घेतली आहे, त्यावेळी हा गैरसमज दूर झाला. त्यानंतर त्यांनीही लस घेण्याचा निर्णय घेतला.