scorecardresearch

‘ऑगस्टा’प्रकरणी डोंगर पोखरून अदृश्य उंदीर!

मुलाखतीत शौरी यांनी मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर ताशेरे ओढले.

Narendra Modi, Arun Shourie , Demonetisation , 500 and 1000 notes, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Arun Shourie : माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची मोदी सरकारवर टीका

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी इटलीतील न्यायालयाने कंपनीचे माजी अध्यक्ष ग्युसेप ओर्सी आणि ब्रुनो स्पॅनोलिनी यांना मुक्त करण्याचा जो निकाल दिला त्याविरोधात अपील न करण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चूक केली, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केली. ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीवर शुक्रवारी करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणाचा तपास म्हणजे डोंगर पोखरून उंदीर – तो देखील अदृश्य उंदीर – शोधून काढल्यासारखे आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकारला ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात नवी माहिती शोधून काढण्यासाठी दोन वर्षांचा काळ होता. पण त्यांनी काय केले, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर या संदर्भात जे काही सांगत आहेत त्यात नवे काहीच नाही, असे शौरी म्हणाले.

मुलाखतीत शौरी यांनी मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर ताशेरे ओढले. देशातील संसदीय लोकशाहीच्या विचारांना हरताळ फासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षीय पद्धतीप्रमाणे एकाधिकारशाही चालवीत असल्याचेही शौरी म्हणाले.

मोदींच्या कार्यकाळात केंद्रातील भ्रष्टाचार कमी झाल्याचे मान्य करीत असतानाच राज्यांमधील भ्रष्टाचाराकडे जाणूनबुजून कानाडोळा केला जात असल्याकडेही शौरींनी लक्ष वेधले. हा मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा, छत्तीसगडमधील सरकारी वितरण प्रणालीतील घोटाळा, शारदा घोटाळा, ललित मोदी प्रकरण, कॉमनवेल्थ घोटाळा अशी उदाहरणे सादर केली.

अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड या काँग्रेसशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कृती घटनाबाह्य़ होती, असेही त्यांनी म्हटले. विरोधी पक्षांतील असंतुष्ट, बंडखोर सदस्यांना आकर्षित आणि आमंत्रित करण्याची भाजपची हेतुपुरस्सर भूमिका पक्षाच्या गोतास काळ ठरणारी असल्याचे शौरी यांनी सांगितले.

मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही शौरींनी आसूड ओढला. अमेरिकेशी मैत्री करून काय फायदा झाला, अमेरिकेचे पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे धोरण बदलले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानच्या बाबतीत तर भारताने आपलेच हसे करून घेतले आहे, असेही शौरी यांनी म्हटले.

देशांतर्गत प्रशासनाच्या आघाडीवरही सर्व काही आलबेल नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. सेना दलांमधील लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांचे संबंध, निमलष्करी दलांना प्रशिक्षित करण्याची पद्धत आदी बाबींकडे त्यांनी लक्ष वेधले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-05-2016 at 03:11 IST

संबंधित बातम्या