China land grab Arunachal Pradesh news: अरुणाचल प्रदेशातील नाह आदिवासी समुदायाने अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर चीनच्या कथित घुसखोरीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) गेल्या सहा वर्षांत त्यांच्या पशुधनासाठीचं चराई क्षेत्र, शिकारीच्या जागा आणि शेतीयोग्य जमिनीच्या मोठ्या भागावर ताबा मिळवल्याचा दावा या समुदायाने केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

‘नाह वेल्फेअर सोसायटी’चे अध्यक्ष केरू चादर यांनी अप्पर सुबनसिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकतंच एक निवेदन सादर केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, “आमच्या पूर्वजांची जमीन, जिथे आम्ही काही वर्षांपूर्वीपर्यंत मुक्तपणे फिरत होतो, शिकार करत होतो आणि वनउत्पादने गोळा करत होतो, तसंच आमच्या जनावरांचे चराई क्षेत्र आता चिनी पीएलएच्या ताब्यात गेले आहे.” अप्पर सुबनसिरीमधील टाकसिंग महसूल मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच वेगवेगळ्या ठिकाणांवर चिनी हालचाली होत असल्याचा आरोप नाह वेल्फेअर सोसायटीने केला आहे. चिनी सरकारने महत्त्वाच्या ठिकाणांवर धोरणात्मक ताबा मिळवून आंतरराष्ट्रीय सीमेवरील प्रदेशांवर आपले नियंत्रण वेगाने वाढवले आहे, असंही संस्थेने म्हटलं आहे.

नाचो मतदारसंघाचे आमदार नाकाप नलो यांनी स्पष्ट केलं की, हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने याचं अधिकृत प्रमाणीकरण आवश्यक आहे. नलो म्हणाले, “या आरोपांची प्रशासनाकडून अधिकृत माहिती घेणे गरजेचे आहे. हा राष्ट्रीय मुद्दा असल्याने या आरोपांबाबत चिंता वाटणे स्वाभाविक आहे.” घुसखोरीचा सविस्तर तपशील देताना नाह वेल्फेअर सोसायटी आरोप केला की, “शक्य तितकी जमीन बळकावण्याच्या उद्देशाने” चीनने गेल्या १० ते १५ वर्षांत टाकसिंग सीमाभागात आपल्या हालचाली लक्षणीयरीत्या वाढवल्या आहेत. या आदिवासी संघटनेच्या मते, २०२० पर्यंत त्यांच्या पारंपारिक नियंत्रणाखाली असलेली अनेक ठिकाणे आता कथितपणे पीएलएने ताब्यात घेतली आहेत.

असाफिला भागातील ओयिंग, चुजार्ता भागातील पनियार, मार्नाफे भागातील मारपन, पोत्रांग तलाव आणि टिनडिंगटांग ही ठिकाणं हळूहळू चीनच्या घुसखोरीच्या विळख्यात आली आहेत, असा आरोप संघटनेने केला आहे. ही सर्व ठिकाणे टाकसिंग मुख्यालयाच्या जवळ असून, यातील काही ठिकाणांना तीर्थक्षेत्र मानले जाते.

पीएलएने भारतीय हद्दीत रस्ते आणि छावण्या उभारल्या

चिनी सैन्याने भारतीय भूभागावर लष्करी छावण्या आणि रस्ते बांधल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. “आम्हाला आमच्या सैन्यावर शंका नाही आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते अनेक वर्षांपासून आमच्या जमिनीचे रक्षण करत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न पुरेसे ठरत नाहीत. टाकसिंग भागात चिनी पीएलएच्या सध्याच्या हालचालींचा हेतू आणि वेग अत्यंत चिंताजनक आहे. आम्ही आमची जमीन दिवसेंदिवस इंच-इंच गमावत आहोत”, असं चादर यांनी निवेदनात नमूद केलं आहे.