अरुणाचल प्रदेशातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे पाच जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील एका रस्ते बांधकामाच्या ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या दोन्ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडल्याची माहिती अरुणाचल प्रदेशच्या राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील ‘केओजारिंग-बायचिंग’ या रस्त्याचं काम सुरू होतं. मात्र, यावेळी अचानक दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी पोहोचले असून युद्धपातळीवर मदतकार्य करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना डोंगराळ भागात प्रवास करताना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी बचाव कार्यासाठी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात येत असल्याची माहिती अप्पर सुबनसिरीच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
पाच लष्करी जवान बेपत्ता
दिबांग व्हॅली जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसानंतर अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात लष्कराची दोन निवारा तंबू (निवारा केंद्र) वाहून गेले आहेत. यामध्ये पाच जवान बेपत्ता झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पुराच्या प्रवाहामुळे लष्कराचे सात जवान वाहून गेले. मात्र, त्यापैकी दोघांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, अद्याप पाच जवान बेपत्ता आहेत.
बेपत्ता जवानांची ओळख उपेंद्र, कुंदन, विनोद, आदित्य आणि समुंदा अशी पटली आहे. त्यांच्या शोधासाठी बचाव पथक तैनात करण्यात आले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. शोध कार्यासाठी आयटीबीपीची ५८ वी बटालियन, जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्सची ६२ आरसीसी, स्थानिक स्वयंसेवक आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांच्या पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
