वृत्तसंस्था, इटानगर
अरुणाचल प्रदेशात मोसमी पावसामुळे मुसळधार पाऊस पडत असून ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील रस्ते आणि महामार्गासारख्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध राष्ट्रीय आणि राज्य संस्थांकडून बचावकार्य सुरू आहे. त्यासाठी हत्तींचाही वापर केला जात आहे. राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
अरुणाचल प्रदेशात पुराचा फटका बसलेल्या नऊ रस्त्यांपैकी केवळ दोनच पुन्हा सुरू करण्यात आले आहे. उर्वरित सात रस्ते बंद आहेत किंवा वाहतुकीसाठी सुरक्षित नाहीत. पापुम परे जिल्ह्यात ढगफुटी होऊन होज-पोतिन मार्ग बंद पडला. त्यामुळे या भागाचे शेजारच्या अनेक जिल्ह्यांशी असलेला संपर्क तुटला आहे.
केयी पान्योर भागातील पोस्सा गावात शनिवारी अचानक आलेल्या पुरामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आणि अनेक ठिकाणी ढिगारा पसरला होता. अरुणाचल प्रदेशात एकूण १२८ घरांचे नुकसान झाले आहे. पान्योर, पापुम परे, क्रा दादी, कुरुंग कुमे, लोअर सुबनसिरी, कमले, अपर सुबनसिरी, इस्ट सियांग, लेपराडा, लोअर सियांग, लोअर दिबांग व्हॅली आणि अंजाव या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी लोअर सियांग जिल्ह्यामध्ये मोठे भूस्खलन होऊन सिजी नदीचा प्रवाह अडला, त्यामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने संभाव्य गंभीर आणि प्राणघातक परिस्थितीचा धोका असल्याचा इशारा दिला. नदीतील मातीचा ढिगारा अचानक कोसळला तर कोणत्याही इशाऱ्याविना अचानक मोठा पूर येऊ शकतो. त्यामुळे मनुष्य, घरे, पाळीव जनावरे, रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधा वाहून जाम्याचा धोका आहे, असा इशारा प्रशासनाने दिला होता. मात्र, नंतर नदीचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून गेल्यामुळे हा धोका टळला.
बचावकर्त्यांनाच वाचवण्याची वेळ
अरुणाचल प्रदेशच्या लोअर दिबांग व्हॅलीमधून वाहणाऱ्या सिसिरी नदीला आलेल्या पुरात रविवारी चार मच्छिमार अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सात स्थानिकांचा रबरी तराफा जोरदार प्रवाहात उलटली. त्यानंतर विविध संस्थांनी राबवलेल्या बचाव मोहिमांमध्ये सोमवारी सकाळी चार मच्छिमारांसह सात स्थानिकांची सुटका करण्यात आली, अशी माहिती दम्बुकचे आमदार पुन्नियो अपुम यांनी दिली. बचावकार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह हवाई दलही सहभागी झाले.
अमित शहांची आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
गुवाहाटी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली. राज्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी केंद्राकडून संपूर्ण मदत दिली जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आसाममध्ये नद्यांना पूर येऊन काही जीवितहानी झाली आहे का, याची त्यांनी माहिती घेतली. आसामच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, धेमाजी क्षेत्रात ६९ गावांमधील १६ हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.
हिमाचल प्रदेशातील यात्रा स्थगित
सिमला : हिमाचल प्रदेशात भूस्खलन, अचानक येणारे पूर आणि अस्थिर हिमनद्या यामुळे कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यांमधील रस्ते असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांतील प्रशासनांनी श्री खंड महादेव यात्रा आणि किन्नौर कैलाश यात्रा पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केल्या आहेत. श्री खंड महादेव मंदिर हे कुल्लू जिल्ह्यात १६,९०० फूट उंचावर वसलेले असून ही देशातील सर्वात कठीण तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. तर किन्नौर कैलाश १९,८५० फूट उंचावर आहे. हे महादेवाचे हिवाळ्यातील निवासस्थान मानले जाते. या दोन्ही यात्रा साधारणतः जुलैमध्ये सुरू होतात.
