इटानगर : अरुणाचलच्या अपर सियांग जिल्ह्यतील सियांग नदीवरील प्रस्तावित बहुउद्देशीय प्रकल्पाला विरोध करत तेथील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. विशेषत: आदि समुदायाचा या ११ हजार २०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाला प्रखर विरोध आहे. गेल्या काही दिवसांपासून या समुदायाचे तरुण आणि महिला सातत्याने धरणे आंदोलन करत आहेत.

दरम्यान, ‘अरुणाचल इंडिजिनस ट्राइब्ज फोरम’ने (एआयटीएफ) सियांग धरणावर चर्चा करण्यासाठी शांतता समितीची स्थापना केल्याची माहिती फोरमचे सरचिटणीस तापी ताई यांनी बुधवारी दिली. ‘एआयटीएफ’ ही आदिवासी संघटनांची सर्वोच्च शिखर परिषद आहे. शनिवारी, २४ ऑक्टोबरला या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे हा प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी आला.

‘सियांग अपर बहुउद्देशीय प्रकल्प’ हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सीमेपलीकडे चीनच्या याच प्रकारच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी आखण्यात आला आहे. मात्र, यामुळे अरुणाचल प्रदेशातील आदि समुदायाची वडिलोपार्जित जमीन आणि घरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. ‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रकि पॉवर कॉर्पोरेशन’तर्फे (एनएचपीसी) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सियांग आणि अपर सियांग जिल्ह्यमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

शनिवारी झालेल्या हिंसाचारात संतप्त जमावाने ‘एनएचपीसी’च्या कार्यालयाचे नुकसान केले, तसेच स्थानिक भाजप नेत्याच्या घरावरही हल्ला केला. दुसरीकडे, अजून प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही, केवळ सर्वेक्षण केले जात आहे, त्याला मंजुरी मिळालेली नाही असे सरकारचे म्हणणे आहे. तर, एकदा ड्रिलिंग मशीनचे काम सुरू झाले की प्रकल्प थांबवता येणार नाही, अशी भीती येथील नागरिकांना भेडसावत आहे.