scorecardresearch

‘एनपीआर’साठी नाव विचारले तर रंगा-बिल्ला सांगा : अरुंधती रॉय

दिल्लीत आंदोलनस्थळी केले वादग्रस्त विधान

‘एनपीआर’साठी नाव विचारले तर रंगा-बिल्ला सांगा : अरुंधती रॉय
संग्रहीत

देशातील महत्वपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य करून कायम चर्चेत राहणाऱ्या लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी आता एनपीआर संदर्भात देखील वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. एनपीआरसाठी तुमचे नाव विचारण्यात आल्यावर रंगा-बिल्ला असे सांगा, असे अरुंधती रॉय यांनी आवाहन केले आहे. त्या दिल्लीत सीएए व एनआरसी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, यावेळी त्यांनी उपस्थितांना अशाप्रकारचे आवाहन केले.

जेव्हा सरकारी कर्मचारी एनपीआरसाठी तुमची माहिती घेण्यासा घरी येतील तेव्हा, त्यांना तुमचे नाव रंगा-बिल्ला व पत्ता 7 रेस कोर्स रोड असा सांगा, असे अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे. भाजपाकडून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हा देशद्रोह असल्याचे म्हटले आहे. तर, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अगोदर अशा बुद्धिजीवी लोकांचेच एक रजिस्टर तयार करायला हवे असे म्हटले आहे.

देशभरात सध्या सीएए (सुधारित नागरिकत्व कायद्या) वरून वादंग सुरू आहे, शिवाय एनपीआरमुळे (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) एनआरसीचा (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) मुद्दा देखील अधिकच चर्चेत आल्याचे दिसत आहे. या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आता अरुंधती रॉय यांनी देखील उडी घेतल्याचे दिसत आहे.

या अगोदरही त्यांनी विविध मुद्यांवरून केंद्र सरकारवर टीका केलेली आहे,  पाकिस्तानमध्ये लष्कराचा वापर त्यांच्या जनतेविरोधात केला जात नाही. भारतात मात्र काही राज्यामध्ये नागरिकांविरोधात लष्कर उभं केलं जातं” असा दावा लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यांनी केलेल्या या दाव्यावरुन त्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं गेलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या