scorecardresearch

गुजरात निवडणुकीनंतर ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, अरविंद केजरीवालांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले, “आम्ही केवळ…”

गुजरात निवडणूक आम आदमी पार्टीसाठी विशेष ठरली आहे. कारण या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.

गुजरात निवडणुकीनंतर ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, अरविंद केजरीवालांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले, “आम्ही केवळ…”
फोटो सौजन्य – अरविंद केजरीवाल अधिकृत ट्वीटर खाते

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागांसह विक्रमी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे ही निवडणूक आम आदमी पार्टीसाठी विशेष ठरली आहे. कारण या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. या संदर्भात बोलताना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरद्वारे गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – Gujarat Election Results 2022 Live: जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार; वाचा प्रत्येक अपडेट

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

“गुजरात विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानंतर गुजरातच्या जनतेने आम आमदी पक्षाला आज राष्ट्रीय पक्ष बनविले आहे. आपला गुजरातमध्ये ज्या प्रमाणात मत मिळाली आहेत, त्यानुसार आप हा कायदेशीर राष्ट्रीय पक्ष बनला आहे. ही मोठी गोष्ट आहे”, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. “आज देशात बोटावर मोजण्याइतके राष्ट्रीय पक्ष आहेत. आता आपचाही त्यात समावेश झाला आहे. दहा वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाचा जन्म झाला होता. आज त्या पक्षाचे दोन राज्यात सरकार आहे आणि आज तो पक्ष राष्ट्रीय पक्ष बनला आहे. आज अनेक जणांना या गोष्टीचं आर्श्चय वाटते आहे”, असेही ते म्हणाले.

“मी आज गुजरातच्या जनतेचे आभार मानतो. मी निवडणुकीदरम्यान जेव्हाही गुजरातला आलो, तेव्हा मला मिळालेले प्रेम, सन्मान, त्याबद्दल मी गुजरातच्या जनतेचा आयुष्यभर ऋणी असेल. गुजरातकडून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. गुजरात एकप्रकारे भाजपाचा गढ मानला जातो. हा गढ तोडण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. आम्हाला गुजरातमध्ये १३ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाले आहेत. इतक्या लोकांनी आपवर विश्वास ठेऊन पहिल्यांदाच मत दिले आहे. त्यासाठीही मी गुजरातमधील जनतेचे आभार मानतो”, असेही ते म्हणाले. तसेच पुढच्यावेळी आपला गुजरातमध्ये नक्की विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – विश्लेषण: राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी ‘आप’ प्रयत्नशील, पण एखादा पक्ष ‘राष्ट्रीय’ कधी ठरतो? यासाठी नेमके काय असतात निकष?

“आम्ही गुजरातमध्ये अत्यंत सभ्यपणे प्रचार केला होता. आम्ही कोणालाही शिवीगाळ केली नाही. केवळ दिल्ली आणि पंजाबमध्ये केलेल्या कामाच्या आधारे आम्ही मतं मागितली. ही गोष्ट आम्हाला बाकी पक्षांपासून वेगळी करते. गेल्या ७५ वर्षात देशात केवळ शिवीगाळ, जातीपातीचे राजकारण केवळ याच गोष्टी झाल्या आहेत. मात्र, आता देशात आप हा एकमेव पक्ष आहे, जो देशात केवळ विकासाचे राजकारण करतो. आम्हाला सकारात्मक राजकारण करायचे आहे. हीच ओळख आम्हाला कायम ठेवायची आहे”, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 21:28 IST

संबंधित बातम्या