पंजाबमध्ये निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला आहे. शिरोमणी अकाली दल, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षात तिहेरी लढत होणार आहे. जसा जसा प्रचाराला वेग येत आहे तसे राजकीय नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या काढत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या मतदारांना फेसबुक लाइव्हद्वारे एक आवाहन केले आहे. ज्या उमेदवाराची शेवटची निवडणूक असते त्याला मतदान करू नका असे त्यांनी लाइव्ह चॅटमध्ये म्हटले आहे. काँग्रेस नेते अमरिंदर सिंग आणि मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांची ही शेवटची निवडणूक आहे.

हे दोघेही नेते म्हणत आहेत की ही आमची शेवटची निवडणूक आहे. तेव्हा या दोन्ही नेत्यांना मतदान करू नका असे केजरीवाल म्हणत आहेत. ज्या व्यक्तीची शेवटची निवडणूक असते तो जनतेचे काम करण्यासाठी थोडाच येतो, असे ते म्हणाले. त्या व्यक्तीला फक्त भ्रष्टाचार करायचा असतो तेव्हा तुम्ही कॅप्टन अमरिंदर सिंग आणि प्रकाश बादल यांना मतदान करू नका असे केजरीवाल यांनी म्हटले.

जर समजा तुम्ही एखाद्या नेत्याकडे जाता आणि त्याला मदत मागतात. समजा त्याने मदत नाकारली तर तुम्ही काय करता. असा प्रश्न केजरीवाल यांनी विचारला. तेव्हा तुम्ही असेच म्हणता ना, पुढच्या वेळी मत मागायला या मग आम्ही सांगू तुम्हाला. जर तुम्ही प्रकाश सिंग आणि अमरिंदर यांच्याकडे गेला आणि त्यांनी काम करण्यास नकार दिला तर तुम्ही त्यांना काय बोलाल असे केजरीवाल यांनी विचारले. ते तर म्हणतील की आम्ही पुढच्या निवडणुकीत उभेच राहणार नाहीत तेव्हा तुम्ही आमचे काय बिघडवू शकाल? तेव्हा तुम्ही त्यांना मतदान करू नका असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.  दरम्यान, आपण ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे. मी आतापर्यंत कधीच पराभूत झालो नाही असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले. अकाली दल हा भ्रष्ट पक्ष आहे आणि आम आदमी पक्ष हा बाहेरच्या लोकांचा पक्ष आहे तेव्हा या निवडणुकीबदद्ल मला आत्मविश्वास आहे असे अमरिंदर सिंग म्हणाले. पंजाबला ड्रग्सच्या विळख्यात अडकला आहे. आपण सत्तेमध्ये आल्यावर चार आठवड्यांच्या आत हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करू असे अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.