Arvind Kejriwal Recusal Plea Justice Swarana Kanta Sharma RSS: “दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या संस्थेच्या कार्यक्रमाला चार वेळा हजेरी लावली”, असा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केला. मद्य धोरण प्रकरण राजकीय असल्याचे नमूद करत या प्रकरणाची सुनावणी घेण्यापासून न्यायमूर्ती स्वरणा कांत यांना दूर करावे, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली. केजरीवाल यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात हजेरी लावली, यावेळी त्यांनी स्वत: युक्तिवाद करताना न्यायमूर्ती स्वरणा कांत शर्मा यांच्यावर आरोप केले.

न्यायमूर्ती स्वरणा कांत शर्मा यांच्यावर आरोप

भाजप-आरएसएसच्या विचारधारेला विरोध करत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी यावेळी नमूद केले. शर्मा यांना हटवले नाही तर याप्रकरणी सुनावणी निष्पक्ष आणि तटस्थ होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “अधिवक्ता परिषद नावाची एक वकिलांची संस्था आहे. या संस्थेची विचारधारा आरएसएस आणि भाजपाशी संलग्न आहे. न्यायमूर्ती स्वरणा कांत यांना यांनी चार वेळा या संस्थेच्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. आम्ही ज्या विधारधारेचा जाहीरपणे कडाडून विरोध करतो तीच विचारधारा त्या मानतात. हा खटला राजकीय आहे”, असे अरविंद केजरीवाल न्यायालयात म्हणाले.

न्यायालयीन दृष्टिकोनाबाबत व्यक्त केली चिंता

केजरीवाल यांनी यावेळी राजकीय पक्षपाताचा आरोप केला आणि न्यायालयीन दृष्टिकोनाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, एका विशिष्ट विचारसरणीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने आपल्या खटल्यातील निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा दाखला दिला. “लोकशाहीमध्ये दृष्टिकोन महत्वाचा आहे”, असे त्यांनी सांगितले. शिवाय “सीबीआय पिंजऱ्यातला पोपट”, असल्याचे त्यांनी जुन्या वक्तव्याचा आधार घेत नमूद केले. तपास यंत्रणांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआय राजकीय झाल्याचे निरीक्षण न्यायालयानेच नोंदवले होते, असेही केजरीवाल म्हणाले.

न्याय मिळेल का? यावर शंका

एका ठराविक विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या संस्थेच्या कार्यक्रमाला न्यायमूर्तींनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्या विचाऱ्यांच्या विरुद्ध असणाऱ्या संशयिताला न्याय मिळेल का? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. “मी त्या विचारसरणीच्या विरोधात आहे, मला न्याय मिळेल का?”, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. मी आज या ठिकाणी संशयित आरोपी म्हणून उभा नाहीये, माझी यापूर्वीच सुटका करण्यात आली आहे. केजरीवाल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जाण्याची परवानगी मागितली. दरम्यान, “तुम्ही चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करता, तुम्ही वकील देखील होऊ शकता”, अशा शब्दात न्यायमूर्तींनी त्यांचे कौतुक केले. यावेळी केजरीवाल यांनी हसत-हसत प्रतिक्रिया देत “मी सध्या जे करतोय त्यात आनंदी आहे”, असे सांगितले.