आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. “कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) आता मुख्य निवडणूक आयुक्तांऐवजी थेट त्यांच्या ‘बॉस’च्या म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे,” असा आक्रमक पवित्रा केजरीवाल यांनी घेतला आहे. या संदर्भातील वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

‘सर्व काही बॉसच्या सांगण्यावरूनच’

केजरीवाल यांनी भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षांच्या मागण्यांचा उल्लेख करत ते म्हणाले, “तुम्ही आधी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहात. पण माझे म्हणणे आहे की, आता मध्यस्थांऐवजी थेट त्यांच्या बॉसच्याच राजीनाम्याची मागणी करा. कारण निवडणूक आयोगात जे काही घडत आहे, ते ज्ञानेश कुमार स्वतःसाठी नाही तर आपल्या बॉससाठी करत आहेत.” निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत केजरीवाल यांनी, “आता देशातील खरी चळवळ ही पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्यासाठीच उभी राहिली पाहिजे,” असे स्पष्ट केले.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनंतर प्रकरण समोर

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनंतर हे प्रकरण समोर आले आहे. या बातमीनुसार, मतदार याद्यांच्या पुनरीक्षणादरम्यान (SIR) आणि फॉर्म ६ समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेवर इतर दोन निवडणूक आयुक्तांनी गंभीर आक्षेप नोंदवले होते. गेल्या १० महिन्यांत सुमारे १४ वेळा या मुद्द्यांवर निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद आणि आक्षेप समोर आले होते.

हा अहवाल समोर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची, त्यांच्या महाभियोगाची आणि ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच मतदार याद्या पूर्ववत करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

‘आजची युवा पिढी (Gen Z) तुमच्यावर विश्वास ठेवत नाही’

दिल्लीतील सत्ताधारी भाजप आणि रस्ते विकास मंत्री प्रवेश वर्मा यांच्यावरही केजरीवाल यांनी गंभीर आरोप केले. रस्ते पाहणीदरम्यान एका तरुणाने व्हिडिओ शूटिंग केल्यामुळे प्रवेश वर्मा यांनी त्याला कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर केजरीवाल यांनी टिळक नगर भागात जाऊन पीडित तरुणाची भेट घेतली.

पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “एका मंत्र्याने भररस्त्यात एका तरुण मुलाला मारहाण केली. हा देश तुमच्या बापाचा नाही. अशा प्रकारे कोणावरही हात उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा देश १४० कोटी भारतीयांचा आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “तुमच्या अशा वागणुकीमुळे आजची युवा पिढी (Gen Z) तुमच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. प्रवेश वर्मा स्वतःला मोदीजींचे आवडते मंत्री सांगतात. पण मी त्या दोघांना सांगू इच्छितो की, देशातील जनता अशा प्रकारची गुंडगिरी कधीही स्वीकारणार नाही.”