गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. या मागणीच्या अनुषंगाने दिल्लीत इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टी आणि आम आदमी पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. या घडामोडी दरम्यानच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीतील बंगला साहिब गुरुद्वारात कथित गोंधळ घातल्याचा आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या आणखी काही नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
गुरुद्वारा परिसरात गोंधळ निर्माण करणं आणि त्यानंतर दिशाभूल करणारे व्हिडीओ व सोशल मीडिया पोस्ट्स प्रसारित करणं, असे आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. दरम्यान, आता तपासाचा भाग म्हणून सादर केलेल्या व्हिडीओ फुटेजची तपासणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर डीएसजीएमसीचे अध्यक्ष हरमीत सिंग कलका यांनी म्हटलं की, “बंगला साहिब गुरुद्वाराजवळ आंदोलन करण्याचा ‘आप’ कार्यकर्त्यांनी केलेला कथित प्रयत्न पाहून शीख समाजात रोष निर्माण झाला. त्यामुळे समितीने ही तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. काही ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी निदर्शक असल्याचं भासवून गुरुद्वारामध्ये प्रवेश केला होता आणि पोस्टर्स झळकवले होते. त्यामुळे तीव्र नाराजी पसरली होती. या अनुषंगाने अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.”
