Arvind Kejriwal On Rahul Gandhi : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालामुळे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला. निर्दोष मुक्तता होताच केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाला खुलं आव्हान दिलं. मात्र, याच पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल काँग्रेसवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.

अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर दिल्ली काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. याबाबत पत्रकारांनी पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना केजरीवाल चांगलेच संतापले. ‘राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि सोनिया गांधी हे कधी तुरुंगात गेले का?’, असा सवाल करत अरविंद केजरीवालांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

काँग्रेसने केलेल्या टीकेला उत्तर देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, “मी काँग्रेसला विचारू इच्छितो, केजरीवाल तुरुंगात गेले. रॉबर्ट वाड्रा तुरुंगात गेले का? संजय सिंह तुरुंगात गेले. राहुल गांधी तुरुंगात गेले का? मनीष सिसोदिया तुरुंगात गेले, सोनिया गांधी तुरुंगात गेल्या का? काँग्रेस काय बोलतंय? त्यांना लाज वाटायला पाहिजे”, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

निर्दोष मुक्तता होताच केजरीवालांचं भाजपाला दिलं खुलं आव्हान

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीत भाजपा सत्तेत आल्यापासून दिल्लीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण दिल्ली उद्ध्वस्त झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सत्तेच्या लालसेचे परिणाम दिल्लीतील तीन कोटी जनतेला भोगावे लागत आहेत. दिल्लीतील लोकांना जाऊन विचारा. आज मी मोदींना आव्हान देतो, जर तुमच्यात हिंमत असेल तर दिल्लीत पुन्हा निवडणुका घ्या. तुम्हाला १० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडेन. दिल्लीतील लोक तुम्हाला कंटाळले आहेत”, अशा शब्दांत केजरीवालांनी टीका केली.

“दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणाचा हा खटला सर्वात मोठा राजकीय कट होता. जो दिल्लीतील आम आदमी पक्षाला सत्तेवरून हटवण्यासाठी भाजपाने रचला होता. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी आणि पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आम आदमी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा देशाच्या हितासाठी काम करावं. सत्तेसाठी कोणीही देश आणि संविधानाशी अशा प्रकारे खेळू नये. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागितली पाहिजे”, असं केजरीवाल म्हणाले.