Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची राऊज एव्हेन्यू न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देत आपण भ्रष्टाचारी नाहीत, तर इमानदार आहोत असं म्हटलं.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर आज सायंकाळी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत थेट भाजपाला खुलं आव्हान दिलं. ‘दिल्लीत आता निवडणूक घ्या, भाजपाच्या १० पेक्षा अधिक जागा निवडून आल्या तर मी राजकारण सोडेन’, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. केजरीवाल यांनी म्हटलं की, “दिल्लीत भाजपा सत्तेत आल्यापासून दिल्लीकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण दिल्ली उद्ध्वस्त झाली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सत्तेच्या लालसेचे परिणाम दिल्लीतील तीन कोटी जनतेला भोगावे लागत आहेत. दिल्लीतील लोकांना जाऊन विचारा. आज मी मोदींना आव्हान देतो, जर तुमच्यात हिंमत असेल तर दिल्लीत पुन्हा निवडणुका घ्या. तुम्हाला १० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडेन. दिल्लीतील लोक तुम्हाला कंटाळले आहेत”, अशा शब्दांत केजरीवालांनी भाजपावर टीका केली.
“दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणाचा हा खटला सर्वात मोठा राजकीय कट होता. जो दिल्लीतील आम आदमी पक्षाला सत्तेवरून हटवण्यासाठी भाजपाने रचला होता. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी आणि पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आम आदमी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा देशाच्या हितासाठी काम करावं. सत्तेसाठी कोणीही देश आणि संविधानाशी अशा प्रकारे खेळू नये. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागितली पाहिजे”, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
२०२२ मध्ये दिल्ली मद्य धोरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याविरोधात करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयकडून याबाबत विविध पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची नावे आरोपपत्रात नमूद करण्यात आली होती. आता याच प्रकरणात न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
