Arvind Kejriwal दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे मागे घेण्यात आले. न्यायालयाने त्यांना फेब्रुवारी महिन्यात निर्दोष ठरवलं. ज्यानंतर या निर्णयाला आव्हान देत सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली. अशात अरविंद केजरीवाल यांनी जस्टिस स्वर्णकांता आणि त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक, तसंच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडून स्वर्णकांता यांच्या मुलांना मिळत असलेल्या केसेस यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच मला त्या न्याय कशा काय देऊ शकतील असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
आयुष्यात अनेक क्षण असे येतात ज्यावेळी जय-पराजय महत्त्वाचा नसतो. त्यावेळी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे योग्य आणि अयोग्य यातून गोष्टी निवडण्याचा. अशा वेळी आपल्याला हे ठरवावं लागतं की कठीण रस्ता निवडायचा की सोपा रस्ता. मी देखील अशाच एका वळणावर उभा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच, की मला एका खोट्या तक्रारीत अडकवण्यात आलं, तुरुंगातही धाडलं गेलं. निवडलेलं सरकार हे चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आलं. आम्हाला काही महिने तुरुंगवास सहन करावा लागला. पण सत्याचा विजय झाला. कारण २७ फेब्रुवारीला माझी सगळ्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. एवढंच नाही तर न्यायालयाने सीबीआयच्या चौकशीवरच प्रश्न उपस्थित केले. तसंच तपास अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले.
सत्याची वाट ही मोठी बिकट असते, मार्ग कठीण असतो-केजरीवाल
पुढे केजरीवाल म्हणाले, असं असलं तरीही सत्याचा मार्ग कठीण असतो. या निर्णयाला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर हे प्रकरण जस्टीस स्वर्णकांता शर्मा यांच्या समोर सुनावणीसाठी आलं. त्यावेळी माझ्या मनात एक मोठा प्रश्न आला तो म्हणजे मला हे जस्टिस स्वर्णकांता शर्मा न्याय देऊ शकतील? माझ्या मनात हा प्रश्न आला याची अनेक कारणं आहेत. पण दोन मुख्य कारणं आहेत.

स्वर्णकांता यांच्यावर प्रश्न उपस्थित करत केजरीवाल यांनी कुठली दोन कारणं सांगितली?
पहिलं कारण हे आहे की आरएसएस विचारधारेच्या ज्या सरकारने मला खोट्या प्रकरणात अडकवलं आणि तुरुंगात धाडलं, त्याच आरएसएसशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय अधिकवक्ता संघाच्या मंचावर त्या स्वतः कितीतरी वेळा गेल्या आहेत. मी आणि आप पक्ष या विचारधारेचे विरोधी आहोत.मग मला त्यांच्यासमोर न्याय मिळू शकतो. तसंच दुसरं म्हणजे जस्टिस स्वर्णकांता यांची दोन्ही मुलं केंद्र सरकारमध्ये काम करत आहेत. दोघंही सरकारी वकील आहेत. सॉलिसिटर जनरल या दोन्ही मुलांना खटले देतात. त्यांना किती खटले द्यावेत, कुठले द्यावेत हे तुषार मेहता ठरवतात. भारताच्या वकिलांच्या पॅनलमध्ये ७०० हून अधिक वकील आहेत. पण जस्टिस स्वर्णकांता यांच्या मुलांना सर्वाधिक प्रकरणं हाताळायला मिळतात. २०२३ ते २०२५ या कालावधीत त्यांच्या मुलाला ५ हजाराहून अधिक डॉकिट्स मिळाले. त्यातून त्यांच्या मुलाला कोट्यवधी रुपयांची फी मिळाली. तुषार मेहतांवर या दोन्ही मुलांची कमाई तुषार मेहतांवर अवलंबून आहे. यानंतर कुणाच्याही मनात प्रश्न येणार की जस्टिस स्वर्णकांता यांच्या मुलांचं भवितव्य आणि त्यांचं उत्पन्न हे जर का तुषार मेहता ठरवणार आहेत. तर त्यांच्याविरोधात स्वर्णकांता निर्णय देतील? न्यायव्यवस्थेचा संपूर्ण आदर राखून मी हा प्रश्न विचारतो आहे, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी न्याय व्यवस्थेबाबत काय म्हटलं आहे?
मी न्यायव्यवस्थेचा सन्मान करतो, माझ्या विरोधात कट रचण्यात आला तेव्हा आपल्या न्याय व्यवस्थेनेच मला वाचवलं.
याच न्याय व्यवस्थेने मला दोषमुक्त ठरवलं, मला जामीन मंजूर केला होता.
मागील ७५ वर्षांत जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा न्याय व्यवस्थेनेच आपला देश वाचवला आहे.
जस्टिस स्वर्णकांता यांच्याविषयी मला पूर्ण आदर आहे, मला त्यांच्याबाबत किंवा त्यांच्या कुटुंबाबात कुठलाही व्यक्तिगत आकस किंवा असूया नाही.
जस्टीस स्वर्णकांता यांना मी निवेदन दिलं आहे, की कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चा मुद्दा पुढे करत तुम्ही या प्रकरणापासून स्वतःला वेगळं करा. पण त्यांनी माझी विनंती मान्य केली नाही आणि त्या स्वतःच या प्रकरणाची सुनावणी ऐकणार आहेत.
मी सुनावणीला सामोरा जाणार नाही, माझा वकीलही जाणार नाही-अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, आज माझ्या हातात एक सोपा मार्ग आहे की मी जस्टिस स्वर्णकांता यांचा आदेश मान्य करुन सुनावणीला सामोरा जाऊ. एक मोठा वकील उभा करुन मी माझा खटला लढू. पण हा मुद्दा माझ्या केसपुरता नाही. सामान्य लोकांनाही उद्या हे संकट येऊ शकतं. अशा द्विधा मनस्थितीत मला आठवण येते आहे ती महात्मा गांधी यांची. महात्मा गांधींनी आपल्याला सत्याग्रहाचा मार्ग दाखवला आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की अन्यायाचा सामना करताना पहिलं पाऊल विरोधाचं उचलू नका तर ते चर्चेचं उचला. आपलं म्हणणं अन्याय करणाऱ्या व्यक्तीसमोर विनम्रतेने ठेवा. सगळ्या प्रयत्नांच्या नंतरही न्याय मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या अंतरआत्म्याचा आवाज ऐका. अंतरात्म्याने सांगितलं की न्याय झालेला नाही तर सत्याग्रह करा. या सगळ्या गोष्टी करत असताना अन्याय करणाऱ्या व्यक्तीविरोधात कुठलाही तिरस्कार असता कामा नये. मी देखील नम्रतेने जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडे मदतीची याचना केली. मात्र त्यांनी माझं निवेदन ऐकलं नाही. सुनावणी त्या स्वतःच ऐकणार आहेत. मला आता न्याय मिळण्याची भावना धूसर आहे. मलाही तसंच वाटतं आहे. त्यामुळे मी आता जस्टीस स्वर्णकांता यांच्याविरोधात मी सत्याग्रह करणार आहे. मी तिथे उभा राहणार नाही, माझा वकीलही असणार नाही. जस्टिस स्वर्णकांता या ज्या काही निर्णय देतील त्याविरोधात काय कायदेशीर पावलं उचलायची आहेत ते उचलायला मी मुक्त आहे. भविष्यात जर त्यांच्यासमोर उभं राहण्याची वेळ आली तर त्यांच्यासह तुषार मेहता, भाजपा नसतील तर त्या प्रकरणाच्या सुनावणीला मी नक्की सामोरा जाईन, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
