scorecardresearch

भाजपा कार्यकर्त्यांनी घराबाहेर तोडफोड केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझा जीव…”

प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी भाजपावर टीका केली आहे

(Photo – Twitter)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या संबंधात केलेल्या विधानांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी त्यांच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी त्यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेरच्या मालमत्तेची मोडतोड केली. यामुळे या दोन पक्षांमधील शाब्दिक युद्ध पुन्हा तीव्र झाले असून आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत. काल घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


अरविंद केजरीवाल म्हणाले की, “केजरीवाल महत्त्वाचा नाही. मी खूप छोटा माणूस आहे, माझा जीवही देशासाठी हाजीर आहे, पण अशा गुंडगिरीने देशाची प्रगती होणार नाही. २१व्या शतकातील भारतासाठी आपल्याला प्रेमाने काम करावे लागेल. मारहाण आणि गुंडगिरीत आपण ७५ वर्षे वाया घालवली आहेत. त्यामुळे देशाच्या सत्ताधारी पक्षाने राजधानीत गुंडगिरी केली तर तरुणांमध्ये काय संदेश जाईल,” असं भाजपावर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले.


नेमकं काय घडलं?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या संबंधात केलेल्या विधानांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी त्यांच्या विरोधात निदर्शने केली. या निदर्शनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली.

आम आदमी पक्षाला निवडणुकीत हरवण्यास भाजप असमर्थ असल्यामुळे केजरीवाल यांची हत्या करण्यासाठी भाजपने हे कारस्थान आखले होते, असा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. याचा प्रतिवाद करताना, ‘आप’ नाटक रचत असून, विस्थापित काश्मिरी पंडितांची थट्टा करणाऱ्या केजरीवाल यांच्या विधानाविरुद्ध जनतेचा संताप उफाळून आल्यामुळे ते ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळत आहेत असा आरोप भाजपाने केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arvind kejriwal reaction after bjp workers vandalised his home hrc

ताज्या बातम्या