Arvind Kejriwal On Raghav Chadha To Join BJP : आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. राज्यसभचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या ७ खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राघव चड्ढा यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन दिली होती. त्यानंतर काही वेळातच खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी भाजपाच्या मुख्यालयात दाखल होत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षात मोठी फूट पडल्याचं समोर आलं असून अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

या सर्व घडामोडीनंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत एका वाक्यात प्रतिक्रिया देत भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी काय म्हटलं?

‘भाजपाने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेबरोबर धोका केला’, अशा शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देत भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं?

राज्यसभेतील ‘आप’च्या दोन-तृतीयांश खासदारांनी भाजपामध्ये विलीन होण्याची घोषणा केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यावर प्रतिक्रिया दिली. भगवंत मान यांनी म्हटलं की, “भाजपा ज्या पक्षाशी युती करतो, त्याला संपवून टाकतो. पंजाबची जनता मला मनापासून पाठिंबा देते. पंजाबच्या विकासाबाबत भाजपाला अडचण आहे.”

खासदार संजय सिंह यांनी काय म्हटलं?

“पंजाबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ राबवलं जात आहे. हे ‘ऑपरेशन लोटस’ पार पाडण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर करण्यात येत आहे. पंजाबची जनता या ‘देशद्रोह्यांना’ कधीही विसरणार नाही”, अशा शब्दांत खासदार संजय सिंह यांनी भाजपावर टीका केली.

“पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ सरकारने केलेल्या चांगल्या कामांमध्ये अडथळा आणण्याचं काम भाजपाने केलं आहे. ‘आप’चे ७ राज्यसभा खासदार भाजपामध्ये सामील होत आहेत. मात्र, पंजाबच्या जनतेने ही ७ नावं लक्षात ठेवावीत. पंजाबची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही”, असंही खासदार संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का

राघव चड्ढा यांची काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाची वाढती जवळीक पाहता आम आदमी पक्षाने त्यांना पदावरुन हटवल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. तसेच त्यानंतर राघव चड्ढा हे भाजपात प्रवेश करण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र, आता राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेतून भाजपात प्रवेश करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्याबरोबर राज्यसभेतील दोन तृतीयांश खासदार असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि पर्यायाने ‘आप’ला हा मोठा धक्का बसला आहे.

भाजपात जाणारे ‘ते’ सात खासदार कोणते?

खासदार राघव चड्ढा यांनी दिलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यसभेतील पक्षाते दोन तृतीयांश खासदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत’. राघव चड्ढा यांच्या व्यतिरिक्त, भाजपामध्ये सामील होणाऱ्या खासदारांमध्ये स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, संदीप पाठक, अशोक मित्तल, राजिंदर गुप्ता आणि विक्रम साहनी यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेत असणाऱ्या ‘आप’च्या १० पैकी एकूण ७ खासदार भाजपात प्रवेश करण्यास तयार असल्याची माहिती चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

खासदार राघव चड्ढा यांनी ‘आप’वर काय आरोप केले?

“ज्या आम आदमी पक्षाला मी घामाने वाढवलं, माझ्या आयुष्याची १५ वर्षे दिली, तो पक्ष आता पक्षाची तत्त्वे, मूल्ये आणि मूळ नैतिकतेपासून भरकटला आहे. आता हा पक्ष राष्ट्राच्या हितासाठी नव्हे, तर स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करतोय”, असा आरोप राघव चड्ढा यांनी केला. “मी योग्य व्यक्ती असूनही चुकीच्या पक्षात आहे, असे मला गेल्या काही वर्षांपासून जाणवत होते. तेव्हा आज मी ‘आप’पासून स्वतःला दूर करत आहे आणि जनतेच्या अधिक जवळ जात आहे असे जाहीर करतो”, असे चड्ढा यांनी म्हटलं आहे.

‘आप’च्या तीन खासदारांचा भाजपात प्रवेश

दरम्यान, राज्यसभा खासदार राघव चड्ढा, राज्यसभा खासदार संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी भाजपाच्या मुख्यालयात दाखल होत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.