Arvind Kejriwal Resignation Who will Next Delhi CM : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शुक्रवारी (१३ सप्टेंबर) जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. दरम्यान, आज (१५ सप्टेंबर) त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन असं केजरीवाल म्हणाले. यावरून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत. अशातच, दिल्लीमधील जनतेसह देशभरातील नागरिकांना प्रश्न पडला आहे की केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यास दिल्लीची सुत्रं कोणाच्या हाती सोपवली जातील. आम आदमी पार्टी पुढील मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करणार?
राजीनाम्याची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले, “काही लोक म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे मी काहीच काम करु शकणार नाही. मुळात, मागी वर्षभरात केंद्र सरकारने आमच्यावर काय कमी अटी घातल्या होत्या का? केंद्र सरकारने कित्येक कायदे आणून आमचं बळ कमी करण्याचा प्रयत्न केला. पुढील दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी व मनिष सिसोदिया (दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री) आम्ही दोघेही दिल्लीतल्या जनतेला भेटू, लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू. त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटत असलो तर आम्हाला ते निवडून देतील”.
दरम्यान, केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पार्टी कोणला मुख्यमंत्री करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी आप नेते गोपाल राय, आतिशी मार्लेना, सौरभ भरद्वाज, कैलाश गहलोत, इम्रान हुसैन आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावांची चर्चा होत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत हे सहा नेते असतील.
मुख्यमंत्रिपदासाठी या नेत्यांचा विचार केला जाऊ शकतो
१. गोपाल राय
केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास या पदासाठी गोपाल राय यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. ते आम आदमी पार्टीचे संयोजक आहेत. केजरीवालांच्या अनुपस्थितीत ते पक्ष संघटनेचं कामकाज पाहतात. ते विद्यमान केजरीवाल सरकारमध्ये मंत्री असून बाबरपूरचे आमदार देखील आहेत.
२. आतिशी मार्लेना
मुख्यमंत्रिपदासाठी आतिशी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्या सध्या दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम व शिक्षणमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्या कालकाजी मतदारसंघाच्या आमदार आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये त्या आपमध्ये केजरीवाल व सिसोदिया यांच्यानंतरच्या तिसऱ्या मोठ्या नेत्या म्हणून ओळखीच्या आहेत. केजरीवाल तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी मार्लेना यांनीच विधानसभेबाहेरील राष्ट्रध्वज फडकवला होता.
हे ही वाचा >> Albert Einstein : अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या पत्राचा ३३ कोटींना लिलाव, अणुबॉम्बबाबत दिला होता ‘हा’ इशारा
३. कैलाश गहलोत
दिल्लीच्या मंत्रिमंडळातील मंत्री कैलाश गहलोत यांच्याकडे एकूण आठ खाती आहेत. यामध्ये कायदा, न्याय व विधीमंडळ व्यवहार, वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहिती व तंत्रज्ञान, महसूल, वित्त आणि नियोजन या खात्यांचा समावेश आहे. केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील इतर कोणत्याही नेत्याकडे इतकी खाती नाहीत.
४. सौरभ भारद्वाज
सौरभ भारद्वाज यांच्याकडे सध्या दक्षता, सेवा, आरोग्य, उद्योग, शहरी विकास व पूर नियंत्रण व पाणी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे.
हे ही वाचा >> “…म्हणून केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दोन दिवस मागितले”, भाजपाचा मोठा आरोप
५, इम्रान हुसैन
इम्रान हुसैन यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे.
६. सुनीता केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावाचाही मुख्यमंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो.