दिल्ली जल बोर्डमधील कथित घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नुकतीच अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांच्यासह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, सत्येंद्र जैन यांच्या अटकेमुळे आम आदमी पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
सत्येंद्र जैन यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घडामोडींवर आता आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देत एक मोठा दावा केला आहे.
‘सत्येंद्र जैन यांना अटक करण्याची एसीबीची कोणतीही योजना मंगळवारी दुपारपर्यंत नव्हती. मात्र, अमित शाह यांच्या फोननंतर परिस्थिती बदलली’, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. या संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत अमित शाह यांच्या फोनबाबत एसीबीच्या एका अधिकाऱ्याने आपल्याला ही माहिती सांगितल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी काय म्हटलं?
“एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मंगळवारी सकाळपर्यंत सत्येंद्र जैन यांना अटक करण्याची एसीबीची कोणतीही योजना नव्हती. मात्र, त्यानंतर दुपारी अमित शाह यांचा फोन आला आणि त्यांनी एसीबीला सांगितलं की सत्येंद्र जैन यांना अटक करा. त्यानंतर एसीबीने सत्येंद्र जैन यांना अटक केली”, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
“त्यामुळे हे स्पष्ट आहे की आता अटकेची कारवाई एखाद्याने गुन्हा केला आहे की नाही? यावर ठरत नाही. तर त्या दोघांना (भाजपामधील नेत्यांना) कोणाला अटक करायची आहे, यावर ठरते”, अशी टीकाही अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
“केजरीवाल भ्रष्टाचाराचे दुकान चालवायचे”; स्वाती मालीवाल यांचा आरोप
सत्येंद्र जैन यांच्यावर झालेल्या कारवाईवर बोलताना भाजपाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल म्हणाल्या की, “गेल्या १० वर्षांत दिल्लीत अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचाराचं दुकान चालवत होते. मग शाळांच्या वर्गखोल्यांचं बांधकाम असो किंवा मद्य घोटाळा, असे अनेक घोटाळे त्यांनी केले आहेत. केजरीवाल यांनी मंत्र्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला. जेव्हा संबंधित मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा केजरीवाल यांनी त्या मंत्र्यांनाच दोष दिला”, अशी टीका स्वाती मालीवाल यांनी केली.
“अरविंद केजरीवाल हे अत्यंत चलाखीने काम करत होते. त्यांनी स्वतःकडे कोणतंही खातं ठेवलं नव्हतं. कारण ते मंत्र्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून घेत असत. मात्र, जेव्हा संबंधित मंत्र्याचा भ्रष्टाचार उघड होत असायचा, तेव्हा ते त्या मंत्र्यांलाच दोष देत असायचे”, असा आरोप मालीवाल यांनी केला.
“दिल्ली जल बोर्डाचा जो एसटीपी घोटाळा समोर आला, तो अतिशय गंभीर आहे. कारण यमुना नदीच्या स्वच्छतेमध्ये एसटीपी हा एक महत्त्वाचा घटक आहे. एवढंच नाही तर सत्येंद्र जैन हे पंजाबमध्ये आम आदमी पक्षासाठी कलेक्शन एजंट म्हणून काम करत आहेत”, असा गंभीर आरोप स्वाती मालीवाल यांनी केला.
