Arvind Kejriwal slams BJP Modi over CBSE exam: पेपरफुटीमुळे केंद्राने नीट परीक्षा रद्द केली, यामुळे देशातील विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. याप्रकरणी देशभरातून अनेकांनी अटक केली जात आहे. या परीक्षेवरुन विरोधकांकडून सत्ताधारी भाजपावर टीका केली जात आहे. अशात एका महिलेने सीबीएसई परीक्षेतील घोळाबाबत पोस्ट लिहली आहे. यावरुन आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीकास्त्र सोडले. “हिंदूंकडून मते मागून ते हिंदूंच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत”, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

सीबीएसई परीक्षेवरुन संताप

झाले असे की, एका महिलेने सीबीएसई परीक्षेत झालेला घोळ आणि त्यामुळे सहन करावा लागेला मनस्ताप याची कैफीयत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मांडली. यावर राष्ट्रीय जनता दलाच्या प्रवक्त्या प्रियांका भारती यांनी महिलेच्या जुन्या पोस्टचा संदर्भ देत प्रतिक्रिया दिली. २०२४ लोकसभा निवडणुकीत या महिलेने मोदीच पुन्हा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला होता. या पोस्ट फोटो शेअर करत भारती यांनी, “तुम्हाला ज्याची अपेक्षा होती तेच मिळालं”, असा खोचक टोला लगावला. याच पोस्टवर केजरीवालांनी देखील मत नोंदवत, “बाभळीचे झाड लावल्यावर आंबे कसे येतील?”, असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली.

काय म्हणाले केजरीवाल?

“बाभळीचे झाड लावलं तर त्याला आंबे कसे येतील? मोदींना मत दिले आहे, त्यामुळे हे होणारच होते. आज सर्व मोदीभक्तांच्या घरांमध्ये आग लागत आहे. प्रत्येकाच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. हीच वेळ आहे सावध होण्याची. हिंदूंकडून मते मागून ते हिंदूंच्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत”, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

महिलेचे CBSE वर आरोप

गीतू मोझा असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने सीबीएसईची नवीन उत्तरपत्रिका तपासणी आणि मूल्यांकन प्रणाली सदोष असल्याचा आरोप केला आहे. यावरुन त्यांनी शिक्षण मंडळावर प्रश्न उपस्थित केले, यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सीबीएसईने शिक्षण व्यवस्थेची आणि देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांची थट्टा केल्याचा आरोप मोझा यांनी केला. मोझा त्यांच्या त्यांची मुलीची उत्तरपत्रिका मागवली होती, उत्तरपत्रिका उशीरा मिळालीच शिवाय त्यातील काही पानं गायब होती, असा आरोप त्यांनी केला. प्रश्नपत्रिका व्यवस्थित न तपासल्याने मार्कांमध्ये तफावत आल्याचा दावा त्यांनी पोस्टमधून केला आहे.