नवी दिल्ली : कथित मद्यविक्री घोटाळ्यातून शुक्रवारी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर, ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शाब्दिक हल्ला करून राजकीय पुनरागमनाचे संकेत दिले. ‘मोदी व शहा या दोघांनी माझ्याविरोधात कटकारस्थान केले होते. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचे षड्-यंत्र रचले’, असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
‘हिंमत असेल तर मोदींनी दिल्लीमध्ये आता निवडणूक घ्यावी, भाजपने १० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन’, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले. फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपने केजरीवाल व ‘आप’विरोधात कथित मद्यविक्री घोटाळा व लाचखोरीविरोधात जोरदार प्रचार केला होता. या आरोपांमुळे ‘आप’ला निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्याचे मानले जात होते.
२०१२मध्ये अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील प्रमुख नेते राहिलेले केजरीवाल हेच भ्रष्टाचारी असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याला प्रत्युत्तर देत केजरीवाल यांनी, ‘मी कट्टर इमानदार आहे’, असे सांगितले. केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील विधानसभा निवडणूक हरल्यानंतर केजरीवाल गायब झाल्याचा आरोप केला गेला. राजकारण्यांकडे गेंड्याची कातडी असते. मी राजकारणी नाही. मी एक प्रामाणिक माणूस आहे. म्हणूनच मी शांत राहिलो. जेव्हा माझी निर्दोष सुटका होईल तेव्हाच मी बोलेन असे मी ठरवले होते,’ असे केजरीवाल म्हणाले.
संपूर्ण दिल्ली उद्ध्वस्त : केजरीवाल
दिल्लीतील जनता भाजप सरकारला कंटाळली असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. संपूर्ण दिल्ली उद्ध्वस्त झाली आहे. मोदी व शहा यांच्या सत्तेच्या लालसेचे मोठे दुष्परिणाम दिल्लीतील तीन कोटी जनतेने भोगले आहेत. हवेचे प्रदूषण, प्रदूषित यमुना, खराब रस्ते या समस्यांनी लोक ग्रस्त झाले आहे. दिल्लीत अराजक माजले आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
‘इंडिया’तील विसंवाद चव्हाट्यावर
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस, द्रमुक, माकप-भाकप, समाजवादी पक्ष, शिवसेना-ठाकरे गट, राष्ट्रीय जनता दल आदी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केजरीवाल यांच्या सुटकेचे स्वागत करताना भाजपच्या द्वेषमूलक राजकारणावर टीका केली. काँग्रेसने मात्र, ‘आप’ हा भाजपचा ‘सहकारी पक्ष’ असल्याने केजरीवाल यांच्याविरोधातील खटले नाहीसे होत असल्याचा तिरकस वार केला. काँग्रेसच्या एकाचवेळी ‘आप’ व भाजपवरील टीकेमुळे ‘इंडिया’ आघाडीमध्ये विसंवाद चव्हाट्यावर आला. केजरीवाल यांनीही काँग्रेसला धारेवर धरले.
दिल्ली, पंजाब, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये भाजपप्रमाणे आप देखील काँग्रेसचा विरोधक आहे. भाजप हा राजकीय पक्ष नव्हे तर इच्छाधारी नाग आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या महत्त्वाकांक्षेपोटी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो. भाजपने १२ वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवर विष ओकले आणि आता नरेंद्र मोदी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत, हे सगळे आदराने नव्हे तर काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी केले जात आहे, अशी टीका काँग्रेसने केली. काँग्रेसच्या प्रतिक्रियेवर केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला. खटला दाखल झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांपैकी कोणीही तुरुंगात का गेले नाही.केजरीवाल तुरुंगात गेले. रॉबर्ट वढेरा तुरुंगात गेले का? असा सवाल त्यांनी केला.
