Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray: “सरकार शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही?”, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि ‘आप’ने आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट करताना काँग्रेसने आंदोलनाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या मुद्याला समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केजरीवालांनी CJI यांच्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिक्षणमंत्री राजीनामा का देत नाहीत? केजरीवालांचा सवाल
“सरकारने त्यांचं काम केलं नाही, त्यानंतर सरकारला जाब विचारण्यानंतरही समाधान न मिळाल्याने लोक रस्त्यावर उतरले, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. शिक्षणमंत्री राजीनामा का देत नाहीत, अनेक मंत्री येतात आणि जातात, शिक्षण व्यवस्था सुधारायला हवी”, असे म्हणत या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे केजरीवाल म्हणाले. “सरकारने सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं, आंदोलकांवर लाठीचार्ज केला तरी देखील आंदोलन मोठे झाले. मेट्रो स्टेशन बंद केले तरी हे तरुण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आंदोलनात सहभागी होतील”, असे केजरीवाल म्हणाले.
आंदोलनाला पाठिंबा असल्याचे वक्तव्य
“उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आम आदमी पक्षाकडून देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या मुद्याला आमचा पाठिंबा आहे. सर्वांनीच या आंदोलनात सहभागी व्हायला हवं”, असे आवाहन केजरीवाल यांनी केली. २०२४ मध्ये नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंडला डिफॉल्ट बेल मिळाली, असा आरोप केजरीवाल यांनी केला. पेपरफुटीतील संशयितांना डिफॉल्ट बेल मिळत असल्याचा दावा केजरीवालांनी केला.
CJI यांच्यावर टिप्पणी करण्याचे टाळले
नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील लाठीचार्जवर प्रकरणी याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. “आमचा वेळ वाया घालवू नका”, अशी टिप्पणी CJI सूर्यकांत यांनी केली. याप्रकरणी प्रश्न विचारला असता अरविंद केजरीवाल यांनी, “मी CJI यांच्यावर काही टिप्पणी करणार नाही”, असे म्हणत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
सरकार दहशतवादी असल्याचा आरोप
आंदोलकांवर देखील हिंसेप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याबाबत केजरीवालांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, “कोणत्या आंदोलकाच्या हातात बंदूक, काठी, दगड होता? असा एक आंदोलक दाखवून द्या. अशा शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर चांगल्या घरातील मुलांवर लाठीचार्ज करणे, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणे त्यांची डोकी फोडणे हे कोणती जबाबदार सरकार आहे? हे तर दहशतवादी आहेत”, अशी टीका केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना केली.
