पीटीआय, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमधील प्रशासकीय अधिकारांसंबंधी केंद्र सरकारने आणलेल्या वटहुकुमाविरोधात विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी केजरीवाल प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून ते विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.

केंद्र सरकारच्या असंवैधानिक, लोकशाहीविरोधी, दिल्लीविरोधी वटहुकुमाविरोधात द्रमुकचा पाठिंबा मिळवण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना १ जून रोजी चेन्नईमध्ये भेटत आहेत, असे ट्वीट केजरवाल यांनी केले. तसेच २ जूनला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रांचीमध्ये भेटत आहे असे दुसरे ट्वीट त्यांनी केले. मोदी सरकारने दिल्लीच्या जनतेविरोधात आणलेल्या वटहुकुमाविरोधात त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने १९ मे रोजी आणलेल्या या वटहुकुमाविरोधात विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी केजरीवाल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याही भेटीची वेळ मागितलेली आहे. मात्र, पक्षाच्या दिल्ली आणि पंजाबमधील नेत्यांनी आपला पाठिंबा देण्यास विरोध केल्यामुळे काँग्रेसने अद्याप या मुद्दय़ावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.