Arvind Kejriwal Resignation Statement BJP Reacts : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. १३ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर केजरीवाल हे वेगवेगळ्या सभा व कार्यक्रमांमधून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. अशातच आज (१५ सप्टेंबर) त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. “पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या या घोषणेनंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, भाजपानेही यावर भाष्य केलं आहे.
भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “केजरीवाल यांनी राजीनामा देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. या दोन दिवसांत ते त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. यासाठी ते दोन दिवसांत पक्षातील सर्व आमदारांचं मन वळवणार”.
“केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाने राजीनामा देण्यास भाग पाडलं आहे”
सिरसा म्हणाले, “अरविंद केजरीवाल स्वतःहून राजीनामा देत नाहीयेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं आहे. न्यायालयाने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून खडे बोल सुनावल्यानंतर त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाही. केजरीवाल भ्रष्टाचारात इतके बुडालेत की सर्वोच्च न्यायालयाला म्हणावं लागलं की तुम्ही मुख्यमंत्रिपदावर बसून सह्या करू शकत नाही”.
केजरीवाल जनतेचं ऐकत नाहीत : भाजपा
भाजपा नेते म्हणाले, आता केजरीवाल म्हणतायत की जनतेचं जे म्हणणं असेल तेच होईल. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी जनतेला विचारलं होतं जेल की बेल (तुरुंग की जामीन), त्यावर जनता म्हणाली जेल. याचाच अर्थ जनतेला जे हवं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. मात्र केजरीवाल जनतेचं ऐकत नाहीत.
हे ही वाचा >> Albert Einstein : अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या पत्राचा ३३ कोटींना लिलाव, अणुबॉम्बबाबत दिला होता ‘हा’ इशारा
राजीनाम्याबाबत घोषणा करताना केजरीवाल काय म्हणाले?
अरविंद केजरीवाल म्हणाले, “काही लोक म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे मी काहीच काम करु शकणार नाही. मागच्या वर्षभरात केंद्र सरकारने काय कमी अटी घातल्या होत्या का? केंद्र सरकारने वेगवेगळे कायदे आणून दिल्ली सरकारची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. पुढील दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी व मनिष सिसोदिया आम्ही दोघेही दिल्लीतल्या जनतेत जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटलो तर ते आम्हाला निवडून देतील”.
© IE Online Media Services (P) Ltd