Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १३ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला. ते गेल्या १७७ दिवसांपासून तुरुंगात होते. २१ मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर २६ जून रोजी त्यांना दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते तुरुंगामधून बाहेर आले. दरम्यान, तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज (१५ सप्टेंबर ) आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

“काही लोक म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे मी काहीच काम करु शकणार नाही. मागच्या काही वर्षभरात केंद्र सरकारने काय कमी अटी घातल्या होत्या का? केंद्र सरकारने एक कायदा, दोन कायदे फक्त कायदे आणून आमची पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर केला. पुढे बोलताना ते म्हणाले, “पुढील दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी (अरविंद केजरीवाल) आणि मनिष सिसोदिया आम्ही दोघेही दिल्लीच्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटत असलो तर आम्हाला ते निवडून देतील”, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

“आता दोन दिवसांत आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये माझ्या ऐवजी आम आदमी पक्षामधील दुसऱ्या नेत्याची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात येईल. आता दिल्लीच्या जनतेचा निर्णय जोपर्यंत येत नाही. तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. आता थेट दिल्लीच्या नागरिकांनी मला पुन्हा निवडून दिल्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया आम्ही जबाबदारी स्वीकारणार आहोत. जनतेला मी प्रामाणिक वाटत असेल तरच जनतेने निवडून द्यावं आणि जर मी प्रामाणिक नसेल तर जनतेने निवडून देऊ नये”, असंही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.