‘ऑपरेशन टायगर’वरून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. शिवसेना (ठाकरे) पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज (१७ जून) दिल्लीत शिवसेनेची (ठाकरे) पत्रकार परिषद पार पडली.

या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या घडामोडींवरून जोरदार टीका केली. मात्र, पत्रकार परिषदेच्या शेवटी पत्रकारांनी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारताच अरविंद सावंत हे पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.

अरविंद सावंत भडकले; पत्रकार परिषदेत काय घडलं?

दिल्लीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला की, ‘उद्धव ठाकरे हे नेत्यांना वेळ देत नाहीत’ असा आरोप केला जात आहे. या प्रश्नावर उत्तर देताना अरविंद सावंत हे भर पत्रकार परिषदेत चांगलेच भडकले. अरविंद सावंत यांनी उलट प्रश्न करत म्हटलं की, “हे तुम्हाला कोण म्हटलं, मला सांगा. असं कोण बोललं सांगा. असं चालणार नाही. आता मी तुमच्यावर आरोप करतो, तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का? असं चालणार नाही. तुम्ही थेट नाव घेऊन बोला ना”, असं म्हणत अरविंद सावंत भर पत्रकार परिषदेत पत्रकारांवर चांगलेच भडकले.

बंडखोर खासदारांनी बैठकीत काय आश्वासन दिलं होतं? राऊतांचा खुलासा

शिवसेनेच्या (ठाकरे) अंतर्गत बैठकीतील एक प्रसंग सांगताना संजय राऊत भावूक झाले. ते म्हणाले, “मला आश्चर्य वाटतंय, काही दिवसांपूर्वीच आमच्या ‘मातोश्री’वरील बैठकीत स्वतः मी, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई प्रत्यक्षात हजर होते. काही खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते. त्या बैठकीतल्या एका खासदाराने तर अवघ्या तीन मिनिटांत तब्बल चारवेळा साईबाबांची शपथ घेतली! ‘माझी बायको आजारी आहे, साईबाबांची शपथ… मी तुमच्यासोबतच आहे, साईबाबांची शपथ… मरेपर्यंत तुमच्यासोबत राहीन, साईबाबांची शपथ…’ असं तो म्हणत होता. दुसऱ्या एकाने आई भवानीची शपथ घेतली, कोणी आपल्या मुला-मुलीची, तर कोणी थेट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवणं भाग होतं”, असा खुलासा संजय राऊतांनी केला.

‘ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं, पण आधी…’ : संजय राऊत

“आता ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, पण आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. तुम्ही आमच्या पक्षाच्या तिकिटावर आणि आमच्या मतदारांच्या जिवावर निवडून आला आहात, हे विसरू नका. यातील काही जण तर आधी तीन-तीन वेळा पराभूत झाले होते, त्यांना पक्षाने खासदार बनवलं, काही जण घरी बसले होते, त्यांनाही पक्षाने संधी दिली”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

खासदारांना ५० कोटींची ऑफर दिल्याचा राऊतांचा दावा

राऊतांनी खासदारांच्या खरेदी-विक्रीचा खळबळजनक आरोप केला. राऊत म्हणाले, “काल रात्री साधारण १०.३० ते ११ च्या सुमारास मला एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. ‘विकत घेतलं जातंय’ हाच शब्द त्यांनी वापरला. पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही आता घेणार नाही. मी जेव्हा त्यांना विचारलं की काय भाव सुरू आहे? तेव्हा ते म्हणाले की भाव तोच आहे, ५० कोटी! आज रात्रीपर्यंत सर्वांना १५ कोटी रुपये पोहोचवले जात आहेत, त्यानंतरच ते खासदार दिल्लीत येतील. त्याशिवाय ते विमानात बसायलाही तयार नाहीत. ही माहिती मी सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवली आहे. अशा पद्धतीने जर शिवसेना किंवा टीएमसीसारखे इतर पक्ष तोडले जाणार असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला काही अर्थच उरत नाही.”

‘जो काही राडा व्हायचा तो होईल’ : राऊतांचा इशारा

“आम्ही याक्षणी कोणावरही थेट आरोप करत नाही आहोत. पण मागे जे काही घडलं, त्याची पुनरावृत्ती जर आता होणार असेल, तर यावेळी महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. जो काही राडा व्हायचा आहे तो होईल! ही जी डरपोकगिरी आणि नादानपणा सुरू आहे, तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही”, असा इशारा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

“प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल”, संजय राऊतांचा ‘ऑपरेशन टायगर’वरून इशारा

“नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरतं. ‘ऑपरेशन टायगर’च्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जातं. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती. खासगी विमानाने फिरण्याएवढी किंमत ‘ठाकरे नावा’मुळे वाढली. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवापळविला ऑपरेशन टायगर का म्हणता?”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.