उद्धव ठाकरे यांची साथ सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र दिलं आणि लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, या बातम्या बुधवारी उशिरापर्यंत आल्या. मंगळवारी रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची माहितीही समोर आली. सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांच्यादेखत बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले अरविंद सावंत?
आम्ही लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यांना आम्ही सांगितलं आहे की फुटीर गटाला मान्यता देऊ नका. कायदेशीर तरतुदी काय आहेत? त्यावरही चर्चा केली आहे. बंडखोर खासदारांपैकी कुणाचीही आमची भेट किंवा चर्चा झालेली नाही असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
कार अन् चार्टर्ड विमानाने प्रवास
समोर आलेल्या माहितीनुसार, या सहापैकी एका खासदाराने हैदराबादपर्यंत कारने प्रवास केला. त्यानंतर तेथून विमानाने दिल्लीपर्यंत प्रवास केल्याची चर्चा आहे. तसेच दोन खासदारांनी स्वतंत्रपणे नांदेड विमानतळावरून चार्टर्ड विमानाने उड्डाण करून दिल्लीपर्यंत प्रवास केल्याची चर्चा आहे. तसेच एका खासदाराने मुंबईवरून दिल्लीला विमानाने प्रवास केल्याचं बोललं जात आहे, तर आणखी एका खासदाराने शिर्डीवरून थेट दिल्लीला विमानाने प्रवास केल्याची चर्चा आहे. या संदर्भातील वृत्त मनी कट्रोलने दिलं आहे. एका वृत्तानुसार, या खासदारांनी दिल्लीला जाताना एकत्र प्रवास करणं टाळलं आहे, म्हणजे एकत्र दिल्लीला न जाता वेगवेगळ्या मार्गांनी ते दिल्लीत पोहोचले आहेत. तसेच दिल्लीपर्यंतच्या प्रवासाबाबत मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
‘ऑपरेशन टायगर’साठी चार्टर्ड विमानाचा वापर? संजय राऊतांचा दावा
ऑपरेशन टायगरवरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत बंडखोर खासदारांना मोठा इशारा दिला. ‘प्रत्येक गोष्टीचा हिशेब केला जाईल’, असं म्हणत संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून जोरदार हल्लाबोल केला. मात्र, या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी एका चार्टर्ड विमानाचा फोटो देखील शेअर केला आहे.
अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा
अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु होती. मात्र, दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला नव्हता. अखेर १० जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींशी बातचीत करुन या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला. यानंतर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यानंतर ऑपरेशन टायगरला खऱ्या अर्थाने वेग आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. आता सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे.
