पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूच्या भेटीवर आहेत. आजपासून चेन्नईत डिफेन्स एक्स्पोला सुरुवात होत असून मोदी या एक्स्पोचं उद्घाटन करणार आहे. पण येथे पोहोचल्यावर मोदींना कावेरी पाणी प्रश्नावरुन विरोधाचा सामना करावा लागला. सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी मोदी चेन्नई विमानतळावर पोहोचले त्यावेळी ‘मोदी परत जा’ अशा घोषणा देण्यात आल्या, तर काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.  मोदी विमानतळावर पोहोचल्याच्या काही मिनिटांनी लगेचच काळे झेंडे दाखवण्यासाठी वाट पाहणारे राजकीय कार्यकर्ते, नेते तसंच अभिनेते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चेन्नई विमानतळाजवळ अलांदूर येथे आंदोलनकर्त्यांनी हातात काळे झेंडे दाखवून निषेध केला. newindianexpress.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.

त्यापूर्वी मोदी तामिळनाडूत पोहोचण्याआधीपासून ट्विटरवर ‘मोदी परत जा’ म्हणजे #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरूवात झाली. हा हॅशटॅग भारतात सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहे. या हॅशटॅगचा वापर करुन अनेकांनी ‘इथं येऊन खोटे अश्रू ढाळू नका’, ‘तामिळनाडूतील जनतेला मूर्ख बनवू नका’ , ‘हे तामिळनाडू आहे, गुजरात नाही, हे लक्षात असू द्या,’ अशा प्रकारच्या भावना अनेकांनी ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.

का होतोय विरोध –
तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कावेरीच्या पाणी वाटपावरुन वाद सुरू आहे. कावेरी प्रश्नावरुन तामिळनाडूच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी केली असून तामिळनाडूच्या वाट्यातील पाणी कमी केलं आणि कर्नाटकचा वाटा वाढवला आहे. याशिवाय कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ गठीत झालेलं नाही. या मुद्द्यांवरुन तामिळनाडूत आंदोलन सुरु आहे. कावेरी पाणी वाटप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल अन्यायकारक असल्याची तामिळनाडूतील जनतेची भावना आहे. या प्रकरणात मोदी सरकारनं तामिळनाडूची बाजू योग्यपणे मांडली नाही, अशी येथील लोकांची भावना आहे. त्यामुळे राज्यातील जनता मोदी सरकारवर नाराज आहे.