लोकभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलत असताना नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला आणि राहुल गांधी म्हणाले की नरवणे यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की डोकलाममध्ये आणि भारतीय सीमेमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. मात्र नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करताच लोकसभेत हंगामा पाहण्यास मिळाला. जे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही ते पुस्तक तुम्ही सभागृहात कसं काय वाचता? असा प्रश्न राजनाथ सिंह यांनी विचारला. तर ओम बिर्ला यांनीही हे सांगितलं की पुस्तक प्रकाशित झालेलं नाही तर मग ते अधिकृत कसं काय मानलं जाणार? सदनाची मर्यादा तुम्ही ओलांडू नका असं ओम बिर्ला राहुल गांधींना म्हणाले. तर हे पुस्तक १०० टक्के नरवणे यांचं आहे आणि अधिकृत आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ज्यानंतर हंगामा सुरु झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळाला.

नेमकं लोकसभेत काय घडलं?

राहुल गांधींकडून सेवानिवृत्त जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न झाला, तर पुस्तक प्रकाशित झालेले नाही त्यामुळे संदर्भ देता येत नाही, मंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जनरल नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही असं अमित शाह यांनीही म्हटलं आहे. राहुल गांधींकडून भारत चीन सीमेवर झालेल्या संघर्षाच्या अनुषंगाने मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आक्षेप घेतला. पुस्तक प्रकाशित झालं आहे की नाही ते राहुल गांधींनी सांगावं अशी मागणी लोकसभेत करण्यात आली ज्यावरुन गदारोळ झाला.

मोदी सरकार मला घाबरत नसेल तर बोलू का देत नाही?

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षाने अर्थसंकल्प निराशाजनक आहे अशी टीका केली. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु झाली. राहुल गांधी बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केला. त्यानंतर जोरदार हंगामा पाहण्यास मिळाला. राहुल गांधी म्हणाले मी या पुस्तकाचा उल्लेख करणार नव्हतो पण आमच्या खासदारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यामुळे मी हा उल्लेख केला. आर्मीचे निवृत्त प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. त्यानंतर माझ्या हातात एक मॅगझीन आहे, त्या मॅगझीनमध्ये लेख आहे तो मी कोट करु इच्छितो असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच मोदी सरकार घाबरत नसेल तर मला बोलू का दिलं जात नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. दरम्यान संरक्षण मंत्री राजनथ सिंह यांनी विरोधी पक्षनेत्यांनी नियमबाह्य वर्तन करु नये असं म्हटलं आहे. ओम बिर्ला यांनीही राहुल गांधी यांना जे पुस्तक प्रकाशितच झालं नाही त्याचा उल्लेख करु नका आणि आपल्या लोकसभेच्या सभागृहाची मर्यादा पाळा असंही ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.