Asaduddin Owaisi remark on Mohan Bhagwat Hindu Muslim Unity Statement: “भारतात मुस्लिमांना स्थान नाही, असे मानणारी व्यक्ती हिंदू असूच शकत नाही,” असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच न्यूयॉर्क येथील कार्यक्रमात केले. यानंतर त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. “हिंदू-मुस्लिम ऐक्याची भाषा करणे ही संघाच्या कार्यपद्धतीमधील अत्यंत जुनी खेळी आहे,” असा टोला ओवैसी यांनी लगावला आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क मधील ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ या धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत असताना हिंदू-मुस्लीम ऐक्याबाबत टिप्पणी केली होती. त्यानंतर ओवैसी यांनी ‘एक्स’वर एक सविस्तर पोस्ट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर आणि त्यांच्या जुन्या भूमिकांवर गंभीर आक्षेप नोंदवले.
संघाचा अल्पसंख्याक आणि लोकशाहीला विरोध
संघाच्या संस्थापक आणि विचारवंतांच्या लिखाणाचा दाखला देत ओवैसी म्हणाले, “संघाने नेहमीच देशातील धार्मिक अल्पसंख्याकांना विरोध केला आहे. संघाचे संस्थापक सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते. मात्र महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्यात सर्व धर्मियांनी एकत्र येण्यास त्यांचा विरोध असल्याने त्यांनी काँग्रेस सोडली.” याशिवाय संघाने सातत्याने लोकशाहीला विरोध करत देशात हुकूमशाहीची मागणी लावून धरल्याचा दावाही त्यांनी केला.
‘मुस्लिम आणि ख्रिश्चन हे संघासाठी अंतर्गत धोका’
ओवेसी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले, “संघाच्या विचारसरणीनुसार देशातील मुस्लिम हे पहिल्या क्रमांकाचे, तर ख्रिश्चन समाज हे दुसऱ्या क्रमांकाचे ‘अंतर्गत धोके’ आहेत. संघाच्या विचारवंतांनी आपल्या साहित्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, मुस्लिम नागरिकांकडे सातत्याने संशयाच्या नजरेने पाहिले पाहिजे.” मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाविषयी गोळवलकर यांनी आपल्या ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये काय लिहून ठेवले आहे, याचेही दाखले ओवैसी यांनी आपल्या पोस्टमध्ये दिले.
ओवैसी यांनी पोस्टच्या शेवटी भागवत यांना विनंती करताना म्हटले की, त्यांनी सावरकर, हेडगेवार, गोळवलकर इत्यादींच्या ग्रंथांमधून केवळ निवडक उतारे वाचून दाखवावेत. त्यानंतर लोक स्वतःच संघाबाबत काय ते मत ठरवतील.
दरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या टिप्पणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत काय म्हणाले?
धर्मगुरूंच्या परिषदेत बोलत असताना मोहन भागवत यांनी २०१८ साली मुस्लीम समुदायाच्या सदस्यांबरोबर झालेल्या एका संभाषणाची आठवण सांगितली. “मुस्लीम बांधवांनी मला विचारले. तुम्ही हिंदू संघटना आहात आणि हिंदू राष्ट्राबद्दल बोलता. मग मुस्लिमांबद्दल काय? तुम्ही आम्हाला बाहेर काढणार का?” मी त्यांना म्हणालो, “नाही, ते हिंदुत्व नाही.”
“जर एखाद्या हिंदूला वाटत असेल की, भारतात एकही मुस्लीम नको. तर तो स्वतः हिंदू नसेल. जर तुम्ही हिंदू असाल तर तुमचा विश्वास असला पाहिजे की, सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे जातात आणि प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा आहे. तुमच्यात आणि त्यांच्यात कोणताही भेद नाही”, असेही मोहन भागवत पुढे म्हणाले.
