“भीतीचं वातावरण असल्याने मुस्लिम महिला रात्री प्रवास करत नाहीत”, असं विधान एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. ‘इंडिया टीव्ही’चे अँकर सौरव शर्मा यांच्या शोमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी हे वक्तव्य केलं. त्यावर अँकरने त्यांना विचारलं की, “फक्त १० ते २० घटनांवरून असा दावा करणं योग्य ठरेल का?” त्यावर उत्तर देताना ओवेसी म्हणाले, “भीती बघायचीय? चला, दिल्लीहून सुटणारी ट्रेन बघा. मी तुमच्यासोबत शर्ट-पँट घालून येतो. पाहूया, ट्रेनमध्ये किती मुस्लिम बसलेले दिसतात.”

“१४० कोटी लोकांच्या देशात १० ते २० घटनांचा उल्लेख करून संपूर्ण समाज विभागला आहे, सर्वत्र मुस्लिमांना टार्गेट केलं जात आहे हे म्हणणं कितपत न्याय्य आहे?”, असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांना केला गेला. त्यावर उत्तर देताना ओवेसी म्हणाले की, “तुम्ही फक्त १० घटनाच म्हणता? हे चुकीचं आहे. या घटना रोज घडतात. भीती बघायचीय? आता दिल्लीहून कोणतीही ट्रेन सुटत असेल तर आपण जाऊया. मी देखील शर्ट-पँट घालून येतो. पाहूया, ट्रेनमध्ये किती मुस्लिम आहेत. तुम्ही तिकडेच लोकांना विचारा की नेमकं वातावरण काय आहे?”

“अफगाणिस्तानशी ना माझ्या वडिलांचा संबंध, ना आजोबांचा”

अँकरने पुढे विचारलं की, “इथे काही लोक आहेत ज्यांचं तालिबानला समर्थन आहे. मग तुम्ही त्यांच्या विरोधात का बोलत नाही?” त्यावर उत्तर देताना ओवेसी म्हणाले की, “अहो, मला अफगाणिस्तानचं काय करायचं आहे? अफगाणिस्तानशी ना माझ्या वडिलांचा संबंध आहे, ना आजोबांचा. तुम्ही कोणत्याही मुस्लिमाला विचारा, तो म्हणेल हो असेल कुठेतरी अफगाणिस्तान आणि प्रतिक्रिया तर इतर लोकांनीही दिल्या आहेत ना?” पुढे ओवेसींनी मोदी सरकारवर देखील टीका केली आहे.

“तालिबानचं मला काय करायचंय?”

ओवेसी म्हणाले, “सरकारने तालिबान्यांना भारताच्या हद्दीत बोलावून कबाब खायला देणं, ही खरी हद्द आहे. त्याच काय? तालिबान ही दहशतवादी संघटना आहे की नाही हे मोदी सरकारने देशाला स्पष्टपणे सांगायला हवं. मला काय करायचं आहे? तालिबानशी माझा काही संबंध नाही. मला काही फरक पडत नाही. पण अफगाणिस्तानमधील बदल हे भारतासाठी निश्चितच चांगले नाहीत. कारण, यामुळे चीन आणि पाकिस्तान मजबूत झाले आहेत, असं मी मानतो.”