Asaduddin Owaisi Statement on Road Namaz Ban: रस्त्यांवर किंवा सार्वजनिक जागेवर नमाज पठण करण्याच्या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून वाद आहे. यावरील काही प्रकरणे न्यायालयातही पोहोचले असून विविध न्यायालयांनी त्या संदर्भात निर्णय दिले आहेत. एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही यावर आता भूमिका मांडली आहे. “रस्त्यावर नमाज पठण करणे चुकीचे मानले जात असेल तर सर्व धर्मांतील उत्सवावर समान निर्बंध लागू करायला हवेत”, असे विधान त्यांनी केले आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी संविधानाच्या कलम २५ चा हवाला दिला. या कलमाने धर्म स्वातंत्र्याचे आणि आपल्या धर्माचे मुक्तपणे पालन करण्याच्या अधिकाराची हमी दिली आहे. ईद मिलापच्या कार्यक्रमात बोलत असताना ओवैसी यांनी सदर युक्तिवाद केला.
सार्वजनिक नमाजला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याचे ते म्हणाले. तसेच इतर धार्मिक समुदायांनी आयोजित केलेल्या धार्मिक मिरवणुका आणि मेळाव्यांबद्दल याचप्रकारची चिंता का व्यक्त केली जात नाही, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले, “घटनेतील कलम २५ लक्षात ठेवा. जर रस्त्यावर नमाज पठण करणे चुकीचे असेल तर इतर धर्माचे सण-उत्सवही रस्त्यावर साजरे करणे चुकीचे आहे. जर इतर सणांच्या वेळी मांसाची दुकाने बंद ठेवावी, असे कुणाचे म्हणणे असेल तर रमजानच्या महिन्यात ३० दिवसांसाठी मद्याची दुकाने बंद ठेवा.”

ओवैसी यांनी दुटप्पी मानसिकतेचा उल्लेख करत म्हटले, लोकांना पंतप्रधान मोदींच्या भाषणांवर आक्षेप नाही. पण अजान आणि नमाजवर आक्षेप आहे. हिंदू सणांच्या काळात अंडी, मांस आणि चिकनच्या विक्रीवर निर्बंध लादण्याची मागणी पुढे येते. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले, हा कसला कायदा आहे?
मुस्लीम समाजाविषयी द्वेष बाळगला जात आहे. यावरुन त्यांना मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवायचे आहे, हे दिसून येते. रमजान आणि बकरी ईद सारखे मुस्लीम सण आल्यानंतर मुद्दामहून अजान आणि नमाजशी निगडित मुद्दे उपस्थित केले जातात, असेही एमआयएमच्या अध्यक्षांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ यांच्या आवाहनानंतर वाद
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्यंतरी नमाज पठणाबद्दल टिप्पणी केली होती. मुस्लीम धर्मीयांनी नियंत्रित पद्धतीने नमाज पठण करावे. यासाठी योगी आदित्यनाथ यांनी शिफ्टमध्ये नमाज पठण करण्याची कल्पना सुचवली होती.
बरेली येथे बोलत असताना योगी आदित्यनाथ यांनी इशारा दिला. ते म्हणाले, “रस्त्यावर नमाज पठण करु दिले जाणार नाही. सरकारी नियम सर्वांसाठी समान आहे. रस्त्यावर अराजकता माजू देणार नाही, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले. प्रेमाने ऐकलं तर ठिक नाहीतर दुसरा मार्ग अवलंबणार. संवाद करणे आमचे काम आहे. संवादाने समजून घेतले तर संवाद नाहीतर संघर्ष.”
योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीही कोलकाताच्या रेड रोडवर ईदची नमाज अदा करण्यास परवानगी नाकारली. यावेळी नमाज इतर मैदानावर हलविण्यास त्यांनी सुचविले.
