Asaduddin Owaisi on T20  WC 2026 : आजपासून आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक २०२६ ही स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताविरोधात लढण्याकरता बांग्लादेश आणि पाकिस्तानने विरोध दर्शवला आहे. यावरून आता AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“भारताने टी २० चं आयोजन केलं आहे. पण त्या छोट्या आणि बेकार पाकिस्तानने भारताविरोधात खेळण्यास नकार दिलाय. आपण त्यांना बोलायला हवं होतं की तुम्ही येथ कसे आलात? तुम्ही इथून चालते व्हा… पण तेच आपल्याला बोलतायत की आम्हीच खेळणार नाही तुमच्याबरोबर. ते इतकं बोलत असताना तुम्ही शांतपणे त्यांचं ऐकून घेत आहात”, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. “पण तुम्ही कशावर बोलणार? हे बंगाली बोलतात मग हे बांगलादेशचे.. यांना दाढी आहे तर त्यांचे कागदपत्र पाहणार. सांगा तुम्ही कुठून आलात? असं विचारणार. जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाहीत”, अशी टीकाही असदुद्दीन ओवैसी यांनी केली.

२०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बांगलादेश बाहेर पडला. त्यामुळे बांगलादेश संघासोबत एकता दर्शविण्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. पाकिस्तानने १ फेब्रुवारीला पोस्ट करत भारताविरूद्ध सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केल्यानंतर पाकिस्तानने निवेदन जाहीर केलं. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की पाकिस्तानने अद्याप आयसीसीला याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. एका संघाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराच्या सोयीस्कर वागण्यामुळे खेळभावनेला ठेच पोहोचते आणि स्पर्धेचं निकोप वातावरणही बिघडतं असं आयसीसीने म्हटलं आहे. पाकिस्तानने अशा प्रकारे एका लढतीवर बहिष्कार टाकला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात असा इशाराही आयसीसीने दिला आहे.

हेही वाचा
पाकिस्तानने भारताविरूद्ध T20 WC सामन्यावर का टाकला बहिष्कार? पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं मोठं वक्तव्य, कारण सांगत म्हणाले…

आयसीसी बोर्डाने टी-२० विश्वचषकाचं वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर बांगलादेशचे श्रीलंकेत सामने पुन्हा आयोजित करण्याच्या मुद्द्यावर मतदान घेतलं, ज्यामध्ये बांगलादेशविरूद्ध १४-२ असं मतदान झालं. फक्त पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने मतदान केलं. बांगलादेशने यानंतरही आपला निर्णय न बदलल्याने स्पर्धेबाहेर होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड स्पर्धेत सामील झाला.