Asaduddin Owaisi On Tipu Sultan Controversy : मालेगाव महापालिकेत उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यावरून मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केली आणि राजकारण तापलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका केली.
टिपू सुलतानवरील वादात आता खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी टिपू सुलतानबाबत आणखी भाष्य केलं. ‘टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाला, टिपू सुलतानच्या अंगठीवर राम लिहिलेलं होतं’, असं वक्तव्य खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं. तसेच असदुद्दीन ओवैसी यांनी डॉ.अब्दुल कलाम आणि महात्मा गांधी यांच्या काही पुस्तकांचा दाखला देत भाजपावर जोरदार टीका केली आहे.
असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?
“टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाला. टिपू सुलतानने तुरुंगात बसून तुमच्या वीर सावरकरांसारखं इंग्रजांना लव्हलेटर लिहिली नाहीत. टिपू सुलतानने तलवार उचलली आणि इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र करण्यासाठी लढाईत शहीद झाला. इंग्रजांना टीपू सुलतानची एवढी भीती होती की दीड तास त्याचा मृतदेह पडून होता. इंग्रजांची फौज आजूबाजूला होती, पण तरीही त्याच्या मृतदेहाजवळ कोणीही जात नव्हतं. कारण त्यांना देखील भीती होती की अचानक उठला तर काय?”, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
“टिपू सुलतानकडे जी सोन्याची अंगठी होती, त्या अंगठीवर राम लिहिलेलं होतं. २०१४ मध्ये त्या अंगठीचा लिलाव देखील झाला. ही गोष्ट खोटी आहे का? डॉ.अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ या पुस्तकात लिहिलंय की रॉकेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण टिपू सुलतानच्या स्वप्नांना पूर्ण करत आहोत. तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी देखील डॉ.अब्दुल कलाम आदर्श आहेत. मग त्यांचं तरी ऐकलं पाहिजे”, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.
“तुम्ही महात्मा गांधींना मानत आहात, मग महात्मा गांधींनी एका मासिकात लिहिलंय की टिपू सुल्तान हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक होते. मग तुम्ही आता महात्मा गांधींना खोटं ठरवणार का?”, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला. “टिपू सुल्तान बादशहा होता. त्याच्या फौजेचं सेनापती कोण होतं? अप्पाजी राम होते, तर सल्लागार कृष्णा राव होते. मग आता हे देखील खोटं आहे का? पण भाजपा फक्त द्वेष पसरवत आहे”, असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार टीका केली.
